मुलुंड येथील हॉटेलमध्ये आग; 3 जण जखमी

मुलुंड येथील हॉटेलमध्ये आग; 3 जण जखमी

मुंबई : मुलुंड पश्चिम येथील काऊ बॉय बार्बी क्यू हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. सुदैवाने या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. (Hotel fire at Mulund 3 people injured)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड (प.), राम रतन त्रिवेणी मार्ग, सेंट्रल बँक येथील काऊ बॉय बार्बी क्यू या हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हॉटेलमध्ये एकच धावपळ झाली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. यावेळी, कमल बुधा (२२), अर्जून मगर (१७) व रोहित थापा (२२) हे तीन कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ पालिकेच्या एम. टी. अगरवाल या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र किरकोळ जखमी झाल्याने सदर तीन जखमींना उपचार करून तात्काळ घरी पाठविण्यात आले.

संबंधीत हॉटेलमध्ये आग का व कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी चौकशी करीत आहेत.

बेस्ट बसला आग

मुंबईतल्या अंधेरी येथील चकाला परिसरात बेस्टच्या बसला आग लागली. दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्यांनी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे या बसमध्ये प्रवासी होते. मात्र प्रवाशांनी आग लागल्याचे समजताच बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला. त्यामुळे सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली.


हेही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला रामराम; फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

First Published on: February 11, 2023 10:10 PM
Exit mobile version