एसटी बँकेतील शेकडो पितळेचे टोकन गायब

एसटी बँकेतील शेकडो पितळेचे टोकन गायब

State-Transport-Co-Op.-Bank-Ltd.-Mumbai-

तब्बल ९० हजार एसटी कर्मचारी सभासद असलेल्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकतील पैसे काढण्यासाठी वापरण्यात येणारे पितळेचे शेकडो टोकन गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेमुळे एसटी बँकेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. गहाळ झालेल्या या टोकनचा कुणी गैरफायदा घेण्याची शक्यता सदस्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे बँकेतील ढिसाळ कारभार समोर आला आहे.

एसटी महामंडळाची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक ही पगारदार आणि नोकरदार यांच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जाते. सध्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेच्या राज्यभरात ५० शाखा आहेत, तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. ८८ हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी या बँकेचे सभासद आहेत. एसटी कर्मचार्‍यांचे पूर्ण व्यवहार या बँकेतून चालतात. मात्र मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणातही बँक चर्चेचा विषय ठरत आहे. बँकेच्या राज्यभरात ५० शाखा असून या शाखांमध्ये साधारणत: बँक व्यहारासाठी ८ हजार ५०० पितळेचे टोकन आहे. मात्र एसटी बँकेच्या शाखेतून शेकडो पितळेचे टोकन गहाळ झाल्यामुळे स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता विविध स्वरूपात भीती व्यक्त होऊ लागली आहे. मुंबई सेंट्रल येथील स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकच्या मुख्यालय आहे. या मुख्यालयातून सुद्धा एकूण १५ पितळेचे टोकन गहाळ झाल्याची कबुली स्वत: बँकेचे महाव्यस्थापक यांनी दिली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार चालणार्‍या बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

डिफॉल्ट म्हणून कारवाई
बँकेतून पैसे काढण्यासाठी सभासदांना पितळेचे टोकन दिले जातात. या टोकनवर स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेच्या शाखेचे नाव आणि क्रमांक असतो. रिझर्व्ह बँकांच्या नियमानुसार जर हे टोकन बँकेच्या कर्मचार्‍यांच्या हातून हरविल्यास त्यांच्यावर डिफॉल्ट म्हणून कारवाई करण्यात येते. बँक सदस्यांकडून टोकन हरविल्यास त्याचा जाबाब १०० रुपयाच्या स्टम्प पेपरवर लिहून घेतला जातो. तसेच त्या पितळेच्या टोकनची किंमत १० रुपये दंड स्वरूपात सदस्याकडून वसूल केली जाते. यासंबंधी परिपत्रक बँकेने सर्व शाखांना दिले आहे. जेणेकरून या टोकनचा कुणी गैरवापर करू नये, मात्र दिवसेंदिवस एसटी बँकेतील पितळेचे टोकन गहाळ होण्याचे प्रमाण वाढत आहे. एस.टी. बँकेत वारंवार अनुचित घटना घडत आहेत. बँक प्रशासन या घटना रोखण्यात कुचकामी ठरत आहे. सोबतच दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार बँकेचे अधिकारी करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.

गहाळ झाले टोक क्रमांक
१०१, १०७ , १०९, १५१, १६४, १६८, १७०, १७१, १८७, १८९, १९१, १९३, १९५, २२० आणि २२६

स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकतील हरवलेल्या टोकनचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून बँकेमार्फत परिपत्रक काढून, या संबंधित माहिती सर्व ब्रांचला दिली जाते. सोबतच खातेदारांकडून जर टोकन हरविल्यास १०० रुपयाच्या स्टम्पपेपरवर त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेतले जात. त्यामुळे हा टोकनचा दुरुपयोग होणार नाही.
– श्रीकांत अंतपुरे, महाव्यस्थापक, स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक

First Published on: May 2, 2019 4:35 AM
Exit mobile version