लालबागच्या राजाच्या वतीने मराठी तरूणांना आयएएस,आयपीएसाठी प्रशिक्षण

लालबागच्या राजाच्या वतीने मराठी तरूणांना आयएएस,आयपीएसाठी प्रशिक्षण

लालबागचा राजा

महाराष्ट्रातील मराठी तरूणांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविता यावं यासाठी ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय स्तरावर मराठी पताका फडकविण्यासाठी या परिक्षेची सखोल माहिती उमेदवारांना व्हावी यासाठी रविवार, १२ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मंडळाच्या वतीने ‘आयएएस,आयपीएस प्रशिक्षण शिबीर’ होणार आहे.

लालबाग चिवडा गल्ली येथील हनुमान मंगल कार्यालयात हे शिबीर पार पडणार आहे. शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध केंद्रीय सेवेंच्या पदांच्या परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती व अभ्यासाची दिशा या विषयी उमेदवारांना विनामूल्य माप्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीराचे उद्घाटन त्रिवेंद्रमच्या जिल्हाधिकारी प्रांजल पाटील (आयएएस) यांच्या हस्ते पार पडेल. सनदी अधिकारी होणाच्या दृष्टीने त्या उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. आयकर विभागाचे उपायुक्त ऋषिकेश उत्पात हे प्रशासकीय सेवेचे शिवधनुष्य पेलताना या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. तर स्वप्नील मुंगळे हे यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारीव मुलाखतकौशल्य या विषयावर मार्गदर्शन करतील.

हे प्रशिक्षण शिबीर विनामूल्य असून अधिकधिक उमेदवारांनी याला आवर्जून उपस्थित राहावे,असे आवाहन मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी शिबीरात सहभागी होण्यासाठी ७ ते ९ जानेवारी सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत लालबागचा राजा प्रबोधिनी, पेरू चाळ कंपाऊंड,डॉ. आंबेडकर रोड,लालबाग येथे नोंदणी करणे गरजेचे आहे.
संपर्क- २४७१५९५९/ २४७१५९५८

First Published on: January 5, 2020 1:06 PM
Exit mobile version