दिवाळीत फेरीवाले जोरात, मास्क कोमात

दिवाळीत फेरीवाले जोरात, मास्क कोमात

दिवाळीत फेरीवाले जोरात, मास्क कोमात

मुंबईत कोरोनाच्या आजार नियंत्रणात येत असल्याने आनंदाची लहर पसरलेली आहे. असे असले तरी दुसरीकडे फेरीवाले व नागरिक मास्क न लावताच दिवाळीच्या खरेदीकरता झुंबड करत आहेत. त्यामुळे हा आजार पुन्हा वाढणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणणाऱ्या महापालिका प्रशासनाकडूनच फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा कोरोनाचा आजार वाढून मुंबईकरांना घरात बसण्याची वेळ येणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मास्क घातला नाही तर दंड केला जाणारच असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. मुंबईमध्ये विना मास्कच्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. एप्रिल ते आतापर्यंत २ लाख २६ हजार ३०१ विना मास्कच्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई कडक केली जात असली तरी दादरसह कांदिवली, घाटकोपर, भांडुप, मालाड, गोरेगाव,वांद्रे, खार, सांताक्रुझ, मस्जिद बंदर,मुलुंड, विक्रोळी, वडाळा आदी भागांमध्ये फेरीवाल्यांकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे म्हणून मास्क लावणे तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे किंवा सॅनिटाईज करणे आदी प्रकारच्या गोष्टींचे पालन केले जात नाही. फेरीवाले मास्क न लावताच भाजी,फळे तसेच इतर वस्तूंची विक्री करत आहेत. नागरिकही या फेरीवाल्यांचे अनुकरण करत मास्क लावता गर्दीतून फिरत आहेत.

अनेक फेरीवाले मास्क न लावता किंवा काही जण दाढीला मास्क अडकवून व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यांमुळे त्यांच्याकडे खरेदीला येणाऱ्या नागरिकांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. महापालिके च्यावतीने सुरु असलेली ही दंडात्मक कारवाई गर्दी ठिकाणांऐवजी अन्य ठिकाणी केली जात आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेर सध्या मोठ्याप्रमाणात फेरीवाले विविध वस्तूंच्या विक्री करण्यासाठी बसत असतात. या फेरीवाल्यांच्या तोंडाला मास्क लावलेले नसतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

घनकचरा व्यवस्थापन विभागावर ही कारवाई करण्याची जबाबदारी आहे. या विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी याबाबत बोलतांना असे सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे मास्क नसेल तर मग ती व्यक्ती कुणीही असो त्यांना २०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हा दंड एक दिवसासाठी नसून दिवसभरात जेव्हा जेव्हा ती व्यक्ती मास्क न घातलेली  दिसेल तेव्हा तेव्हा तो दंड केला जावू शकतो,असे सांगितले. मात्र, मास्क लावणे बंधनकारक आहे, नसेल तर दंड वसूल करू असेही त्यांनी सांगितले.

First Published on: November 11, 2020 5:08 PM
Exit mobile version