हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा

हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा

घाटकोपर रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मुंबईतील २४ वर्षीय मोनिकावर दोन्ही हातांचे प्रत्यारोपण सात दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. हे प्रत्यारोपण झाल्यानंतर मोनिकाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, तिला आणखी एक आठवडा आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मोनिकाच्या दोन्ही हातांवर २८ ऑगस्टला प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेला सात दिवस पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मोनिकावर सध्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आणखीन एक आठवडा तिला आयसीयूमध्ये ठेवले जाईल. आवश्यकतेनुसार तिला सर्व औषधोपचार दिले जात असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आहाराचेही ती योग्य पद्धतीने सेवन करत आहे. याशिवाय आयसीयूमध्ये ती आधार घेऊन चालण्याचाही प्रयत्न करत आहे. काही दिवसांनी हातांची क्रिया सुरळीत व्हावी, यासाठी तिला फिजिओथेरपी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ग्लोबल हॉस्पिटलमधील कन्सल्टंट प्लॅस्टिक हॅण्ड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. निलेश सातभाई यांनी दिली.

First Published on: September 4, 2020 4:59 PM
Exit mobile version