अंतिम सत्राच्या राज्यभरातील परीक्षा संकटात; कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

अंतिम सत्राच्या राज्यभरातील परीक्षा संकटात; कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर 10 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 11 अकृषी विद्यापीठातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्‍यांनी 24 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये सोमवारपासून मुंबई विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी होणार आहेत. विद्यापीठातील कर्मचारी, अधिकार्‍यांच्या या आंदोलनामुळे अंतिम सत्राच्या परीक्षा संकटात आल्या असून निकालावरही याचा परिमाण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून आश्वासनांशिवाय ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचार्‍यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐन परीक्षेच्या काळात हे आंदोलन पुकारण्यात आल्याने त्याचा फटका अंतिम सत्राच्या परीक्षेला बसण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीमार्फत 28 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही कर्मचारी कार्यालयीन कामे करणार नाही. परंतु कामावर आल्याची हजेरी लावणार आहेत. या आंदोलनांनंतरही सरकारने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा व निकालाची कामे करणारे अधिकारी कर्मचारीच काम बंद आंदोलन करणार असल्याने परीक्षेचे निकालही रखडणार आहेत. हे आंदोलन सरकारने आमच्यावर लादले असून त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक दीपक घोणे यांनी दिला.

एसएनडीटी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी 24 सप्टेंबरपासूनच या आंदोलनात सहभागी झाले आहेत. एसएनडीटीच्या चर्चगेट, जुहू आणि पुणे कॅम्पसमधील शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती एसएनडीटी विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे महासचिव यशवंत गावडे यांनी सांगितले.

आम्ही कित्येक महिने सरकारकडे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वारंवार मागणी करत आहे. परंतु आम्हाच्या तोंडाला हरताळ फासण्यात येत होता. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
– अभय राणे, अध्यक्ष, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ 
First Published on: September 26, 2020 8:17 PM
Exit mobile version