नेरुळमधील कृष्णा, त्रिमूर्ती इमारतींवर हातोडा पडणार का?

नेरुळमधील कृष्णा, त्रिमूर्ती  इमारतींवर हातोडा पडणार का?

नेरुळमधील कृष्णा, त्रिमूर्ती इमारतींवर हातोडा पडणार का?

सुमारे १९० कुटुंबे असलेल्या नेरूळमधील कृष्णा कॉम्प्लेक्स व त्रिमूर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवरील कारवाईच्या निर्णयावर आज सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने या इमारती पाडण्याचे आदेश दिल्यावर येथील रहिवाशांनी बचावासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या इमारतीमधील रहिवाशांची घरे राहणार की जाणार, यावर सोमवारी निर्णय होणार आहे. त्यामुळे रहिवाशांचे त्याकडे लक्ष लागले आहे. नेरूळ सेक्टर १६ अ मधील घर क्रमांक २०७ वर सन २०११ मध्ये कृष्णा कॉम्प्लेक्स व त्रिमूर्ती पार्क या दोन इमारती उभारण्यात आल्या. ज्या वेळी या इमारतींचे काम सुरु होते त्यावेळीही मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून इमारत विकासकांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करत अंबाजी पटेल व निलेश भगत या विकासकांनी इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवले. सन २००९ पासून सुरु करण्यात आलेल्या या इमारतींचे काम ३ वर्षांनी पूर्ण झाले असता त्यातील घरांची २०१० नंतर विक्री करण्यात आली. घरे घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ही इमारत अनधिकृत असल्याची कोणतीही माहिती न देता सर्रास घरे विक्री करण्यात आल्याने शेकडो जणांची फसवणूक झाली.

सन २०१३ मध्ये पुन्हा मनपाची नोटीस रहिवाशांना मिळाली असता एकच खळबळ उडाली. त्याही वेळी विकासकांनी रहिवाशांना दिलासा देत काही होणार नाही असे सांगितले. मात्र त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली असता त्यांनी अतिक्रमणाविरोधात मोहीमच उघडली. सन २०१६ मध्ये मुंढे यांनी या दोन्ही इमारतींना नोटीस देत अतिक्रमण विभागाला इमारती पाडण्याचेच आदेश दिले. त्यांच्या या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावेळी त्यांना तात्पुरता दिलासाही मिळाला, मात्र त्यांना फार काळ न्यायालयात तग धरता न आल्याने अखेर ३० जून २०१८ ला उच्च न्यायालयाने या दोन्ही इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

ऐन पावसाळ्यात जाणार कुठे असा प्रश्न या रहिवाशांना पडला असता त्यांनी तत्काळ या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सोमवारी यावर अंतिम निर्णयाची सुनावणी होणार असल्याने १९० कुटुंबाचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले त्यांच्यावर कधीच गुन्हे दाखल झाले आहेत,तरी त्यांच्यावर कारवाई नाही, ते आजही मोकाट फिरत आहे. आम्ही आमचे घर वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत. अशातच काही स्थानिक राजकीय नेते आमच्याच इमारती पाडण्यासाठी मनपावर दबाव आणत आहेत.
-किरण धान्द्रूत, रहिवाशी, कृष्णा कॉम्प्लेक्स.

नेरूळमधील कृष्णा कॉम्प्लेक्स व त्रिमूर्ती पार्क या दोन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ३० जून रोजी दिले आहेत. त्यांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच या इमारतींवर कारवाई करण्यात येईल.
अमरीश पटनीगिरे , उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

First Published on: July 9, 2018 12:20 PM
Exit mobile version