तीन वर्षांत डेंग्यूचे रुग्ण वाढले, दररोज ३ जणांना होते लागण!

तीन वर्षांत डेंग्यूचे रुग्ण वाढले, दररोज ३ जणांना होते लागण!

गेल्या तीन वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले

पावसाळा आता संपला आहे पण वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या मुंबईसह राज्याला डेंग्यूने विळखा घातला असल्याचं समोर येत आहे. दरदिवसाला तीन जणांना डेंग्यूची लागण होत आहे. तर मुंबईत गेल्या तीन वर्षांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाला डेंग्यूचे तीन रुग्ण आढळत आहेत. तर, ३७ संशयित डेंग्यूचे रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या ३५ महिन्यात म्हणजेच तीन वर्षात ३८ मुंबईकरांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेकडून मिळाली आहे.


वाचा – गेल्या ५ वर्षात ९८ टक्क्यांनी वाढला डेंग्यू


तीन वर्षात दगावलेले रुग्ण

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या ३ वर्षात मुंबई महानगरपालिकेकडे डेंग्यूच्या रुग्णाची माहिती मागितली होती. त्यानुसार, मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने अनिल गलगली यांना वर्ष २०१६, वर्ष २०१७, ११ नोव्हेंबर २०१८ या ३५ महिन्यांची माहिती दिली. त्यात डेंग्यूचे निश्चित रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची आकडेवारी दिली. यात निश्चित डेंग्यूचे रुग्ण २०१६ मध्ये ११८०, २०१७ मध्ये ११३४ तर, १ जानेवारी २०१८ पासून ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९४५ इतके रुग्ण आढळले होते. तर, २०१६ मध्ये ०७ , २०१७ मध्ये १७ आणि ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४ इतके रुग्ण डेंग्यूने मृत्यूमुखी पडले आहेत. संशयित रुग्णांची संख्या २०१६ मध्ये १३ हजार २१३ , २०१७ मध्ये १२ हजार ९१३ तर, यावर्षीच्या ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत १३ हजार १३८ इतकी आहे.


वाचा – मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढले; सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ५ बळी


जनजागृती करण्याची गरज

एकंदरीत दरदिवशी ३ निश्चित आणि ३७ संशयित डेंग्यूचे रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या ३५ महिन्यात ३८ मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून प्रत्येक महिन्याला सरासरी १ रुग्ण डेंग्यूला बळी पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य खात्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. शिवाय, ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना डेंग्यूच्या बाबतीत सरळ आणि स्पष्ट माहिती मिळत नाही असाही आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.


वाचा – मुंबईला डेंग्यूचा डंख; ५ महिन्यांत १४ बळी


First Published on: November 29, 2018 7:25 PM
Exit mobile version