मार्ग सुलभतेने बदलण्यासाठी कोस्टल रोडमध्ये ‘आंतरबदल’

मार्ग सुलभतेने बदलण्यासाठी कोस्टल रोडमध्ये ‘आंतरबदल’

कोस्टल रोड

दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ (Princess Street) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वांद्रे-वरळी सी लिंक) यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा कोस्टल रोड (सागरी किनारा रस्ता) हा बृहन्मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा आणि विविध घटक असलेला देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार मार्ग बदल करता यावे किंवा बाहेर पडता यावे, यासाठी या रस्त्यावर अमर सन्स उद्यान, हाजीअली व ‘वरळी सी फेस’ या तीन ठिकाणी आंतरबदल (Interchange) सुविधा असणार आहेत. या ‘आंतरबदल’ सुविधांमध्ये एकूण १८ मार्गबदल पर्याय (Interchange Arms / फाटा) असणार आहेत. यापैकी ९ पर्याय ‘कोस्टल रोड’ वर प्रवेश करण्यासाठी, तर ९ पर्याय हे या रस्त्यावरुन बाहेर पडण्यासाठी असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्धारित मानकांनुसार (International Codes of Standards) अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन बांधण्यात येणाऱ्या या तिन्ही आंतरबदलांची एकूण लांबी ही १३.८८ किलोमीटर असणार आहे. हाजी अली येथील आंतरबदल तीन स्तरीय (Three Level) असणार असून याची जमिनीपासून अधिकतम उंची २४ मीटर असणार आहे. तर ‘वरळी सी फेस’ येथील दोन स्तरीय आंतरबदलांची जास्तीतजास्त उंची ही ११.३ मीटर,तर अमर सन्स उद्यान येथील एक स्तरीय आंतरबदलांची कमाल उंची ११.४ मीटर असणार आहे, अशी माहिती ‘मुंबई सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता श्री. मोहन माचिवाल यांनी दिली आहे.

आंतरबदलांची ठळक वैशिष्ट्ये

१) सागरी किनारा रस्त्याचे आंतरबदल हे समुद्रात व समुद्रालगत भागात बांधण्यात येणार असल्यामुळे, त्यामध्ये वापरण्यात येणा-या सळयांना ‘फ्यूजन बॉण्डेड इपॉक्सी कोटींग’ किंवा ‘सिमेंट पॉलिमर कंपोझिट कोटींग’ करण्यात येणार आहे. तसेच आंतरबदलांच्या बाह्यपृष्ठ भागांवर वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या रंगांचा थर देण्यात येणार आहे. या दोन्ही बाबींमुळे सळयांवर व बाह्यपृष्ठ भागावर समुद्री हवेचा व खा-या पाण्याचा परिणाम होऊ शकणार नाही.

२) तसेच पावसाचे वा भरतीच्या लाटांचे पाणी आंतरबदलांवरुन वाहून जावे, यासाठी प्रत्येक पर्यायी मार्गाच्या दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण जल उत्सर्जन व्यवस्था असणार आहे.

३) आंतरबदलांच्या प्रत्येक पर्यायी मार्गावर एलईडी पद्धतीचे दिवे वैशिष्ट्यपूर्ण कोन साधून खांबांवर बसविण्यात येणार आहेत; ज्यामुळे मार्गावरील प्रत्येक ठिकाणी ‘४० लक्स’एवढा प्रकाश असेल. त्याचबरोबर आंतरबदलांचे पर्याय मार्ग हे जिथे बहुस्तरीय (Multi Level / Multi Tier Arms of Interchange) असतील, तिथे अधिक क्षमतेचे दिवे(High Mast) लावणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

४) या रस्त्यावरुन प्रवास करणा-यांना अधिक सुलभतेने रस्त्याचा वापर करता यावा, रस्त्यावरुन बाहेर पडण्यासाठी किंवा रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी; याकरिता महत्त्वाच्या अमर सन्स उद्यान, हाजीअली व वरळी सी फेस या ३ ठिकाणी ‘आंतरबदल’ प्रस्तावित केले आहेत.

५) आंतरबदलांमधील प्रत्येक पर्यायी मार्गावर वाहन वेग मर्यादा ही ४० किमी प्रती तास एवढी असणार आहे. तर ‘कोस्टल रोड’ वरुन आंतरबदलांमध्ये जाण्यासाठी किंवा आंतरबदलांमधून बाहेर येताना, वाहन ज्या ठिकाणी मार्ग बदलेल, त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारचे ‘क्रॅश ऍटोनेटर’ बसविण्यात येणार आहेत. यावर वाहन आदळल्यास’स्प्रिंग ऍक्शन’ ने वाहन व वाहनातील प्रवाश्यांचे इजा होण्यापासून संरक्षण होऊ शकणार आहे.

६) सागरी किनारा रस्त्यावर असणारे प्रस्तावित आंतरबदल ३ ठिकाणी असून या आंतरबदलांमधील मार्गबदल पर्यायांची (Interchange Arms) एकूण संख्या १८ असणार आहे. यामध्ये ९ पर्याय हे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरुन सागरी किनारा रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी असणार आहेत. तर उर्वरित ९ पर्याय हे सागरी किनारा रस्त्यावरुन बाहेर पडण्यासाठी असणार आहेत.

७) सागरी किनारा रस्त्यावरील आंतरबदलांच्या प्रत्येक पर्यायी मार्गाची एकूण रूंदी ११ मीटर असणार आहे. तर प्रत्यक्ष रस्त्याची रुंदी ही १० मीटर इतकी असणार असून यामध्ये सुमारे ०.७५ मीटर अंतराच्या दोन ‘एज स्ट्रीप’ (Edge Strip) चा देखील समावेश आहे. तर उर्वरित सुमारे १ मीटरमध्ये दोन्ही बाजूस संरक्षक भिंती (कठडा)असणार आहेत.

८) सागरी किनारा रस्त्याच्या आंतरबदलांमधील प्रत्येक पर्यायी रस्त्यावर ३ मार्गिका असणार आहेत. यापैकी २ मार्गिका या प्रत्येकी ३.५ मीटर रुंदीच्या असणार आहेत. तर तिसरी २.२५ मीटर रुंदीची मार्गिका ही आपत्कालीन परिस्थिती दरम्यान वापरासाठी असणार आहे.

अमर सन्स उद्यान येथील आंतरबदल

१) सागरी किनारा रस्त्यावर ‘अमर सन्स उद्यान’ याठिकाणी पहिले आंतरबदल प्रस्तावित करण्यात आले आहे. या आंतरबदलामध्ये ४ पर्यायी मार्गांचा समावेश असून यांची एकूण लांबी ही २.५२ किलोमीटर एवढी असणार आहे. हा आंतरबदल एकस्तरीय (Single Tier) असणार असून याची जमिनीपासून अधिकतम उंची ११.४ मीटर असणार आहे.

२) या आंतरबदलामधील पहिला पर्यायी मार्ग (Interchange Arm) हा नेताजी सुभाष मार्गाकडून (Marine Drive) ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-यांना ‘टाटा गार्डन’ कडे बाहेर पडण्यासाठी असेल; तर दुसरा पर्यायी मार्ग हा ‘टाटा गार्डन’ येथून ‘कोस्टल रोड’ वर प्रवेश करुन ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वरळी वांद्रे सी लिंक) कडे जाण्यासाठी असेल.

३) तिसरा पर्यायी मार्ग हा ‘टाटा गार्डन’ कडून नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्याकरीता कोस्टल रोडवर प्रवेश करण्यासाठी असेल; तर चौथा पर्यायी मार्ग हा ‘राजीव गांधी सागरी सेतू’ कडून ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-यांना ‘टाटा गार्डन’ येथे बाहेर पडण्यासाठी असेल.

 

हाजी अली येथील आंतरबदल

· सागरी किनारा रस्त्यावर ‘हाजी अली’ येथे दुसरे आंतरबदल प्रस्तावित करण्यात आले आहे. या आंतरबदलामध्ये ८ पर्यायी मार्गांचा समावेश असून यांची एकूण लांबी ही ६.९१ किलोमीटर एवढी असणार आहे. हा आंतरबदल तीन स्तरीय (Three Tier / Three Level) असणार असून याची जमिनीपासून अधिकतम उंची २४ मीटर असणार आहे.
· या आंतरबदलामधील ‘पर्यायी मार्ग क्रमांक १’ हा नेताजी सुभाष मार्गाकडून ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-यांना रजनी पटेल चौकाकडे बाहेर पडण्यासाठी असेल; तर ‘पर्यायी मार्ग क्रमांक २’ हा ‘वत्सलाबाई देसाई चौक’ (हाजी अली चौक) येथून ‘कोस्टल रोड’ वर प्रवेश करुन ‘राजीव गांधी सागरी सेतू’ कडे जाण्यासाठी असेल. ‘पर्यायी मार्ग क्रमांक ३’ हा रजनी पटेल चौकातून कोस्टल रोडवर प्रवेश करुन नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्यासाठी असेल.
· ‘पर्यायी मार्ग क्रमांक ४’ हा ‘राजीव गांधी सागरी सेतू’ कडून ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-यांना ‘वत्सलाबाई देसाई चौक’ येथे बाहेर पडण्यासाठी असेल. तर याच मार्गाला जोडलेला ‘पर्यायी मार्ग क्रमांक ७’ ‘राजीव गांधी सागरी सेतू’ कडून ‘कोस्टल रोड’ द्वारे येणा-यांना ‘रजनी पटेल चौकात’ बाहेर पडण्याकरिता असेल.
· ‘पर्यायी मार्ग क्रमांक ५’ हा नेताजी सुभाष मार्गाकडून येणा-या वाहनांना वत्सलाबाई देसाई चौक येथे बाहेर पडण्याकरिता असेल. तर ‘पर्यायी मार्ग क्रमांक ६’ हा ‘वत्सलाबाई देसाई चौक’ येथून नेताजी सुभाष मार्गाकडे जाण्याकरिता ‘कोस्टल रोड’ वर प्रवेश करण्यासाठी असेल.
· ‘पर्यायी मार्ग क्रमांक ८’ हा रजनी पटेल चौकातून ‘राजीव गांधी सागरी सेतू’ कडे जाण्यासाठी ‘कोस्टल रोड’वर प्रवेश करण्यासाठी असेल.

वरळी सी लिंक येथील आंतरबदल

· या आंतरबदलामध्ये ६ पर्यायी मार्गांचा समावेश असून यांची एकूण लांबी ही ४.४५ किलोमीटर एवढी असणार आहे. हा आंतरबदल दोन स्तरीय (Two Tier Level)असणार असून याची जमिनीपासून अधिकतम उंची ११.३ मीटर असणार आहे.
· या आंतरबदलामधील ‘पर्यायी मार्ग क्रमांक १’ हा नेताजी सुभाष मार्गाकडून ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-यांना ‘बिंदूमाधव ठाकरे चौक’ येथे बाहेर पडण्यासाठी असेल. ज्याद्वारे वरळी नाक्याकडे किंवा ‘वरळी डेअरी’ कडे जाता येऊ शकेल. तर याच मार्गाला ‘पर्यायी मार्ग क्रमांक २’ जोडलेला असून त्याद्वारे ‘जे. के. कपूर चौक’ (महाराष्ट्र रायफल असोसिएशन) येथे बाहेर पडता येईल. ज्यामुळे वरळी गाव, प्रभादेवी वा दादरकडे जाणे सुलभ होणार आहे.
· ‘पर्यायी मार्ग क्रमांक ३’ हा ‘जे. के. कपूर चौका’कडून कोस्टल रोडवद्वारे राजीव गांधी सागरी सेतूकडे वांद्रयाच्या दिशेने जाण्यास उपयोगी ठरेल. याच पर्यायी मार्गाला’पर्यायी मार्ग क्रमांक ५’ देखील जोडलेला आहे. या पाचव्या क्रमांकाच्या पर्यायी मार्गाद्वारे जे. के. कपूर चौकाकडून कोस्टल रोड द्वारे नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेने जाता येईल.
· ‘पर्यायी मार्ग क्रमांक ४’ या मार्गाने नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेकडून ‘कोस्टल रोड’द्वारे येणा-या वाहनांना ‘जे. के. कपूर चौकाकडे (महाराष्ट्र रायफल असोसिएशन) बाहेर पडता येणार आहे. तर ‘पर्यायी मार्ग क्रमांक ६’ या मार्गाने ‘बिंदूमाधव ठाकरे चौका’तून कोस्टल रोडद्वारे नेताजी सुभाष मार्गाच्या दिशेने जाता येईल.

First Published on: October 18, 2018 10:23 PM
Exit mobile version