‘मुलींना प्राथमिक शाळांपासूनच स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक’

‘मुलींना प्राथमिक शाळांपासूनच स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक’

महिलांवरील विविध हल्लांच्या घटना बघता मुलींना प्राथमिक शाळांपासून स्वसंरक्षाचे धडे देणे आवश्यक असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपले मुंबई शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्व महिलांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा शनिवारी यशवंत नाटयमंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

उप जिल्हाधिकारी फरोग मुकादम बोलताना पुढे म्हणाल्या की, ‘महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असून महिलांच्या एकत्रितपणातून आपण यापुढेही अनेक शिखरे पादाक्रांत करणार आहोत’.

‘निर्णयाची जबाबदारी घ्यायला हवी’

कायदे तज्ञ जाई वैद्य यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ‘महिलांना हक्क आणि अधिकारासोबतच त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकविले पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने शंभर टक्के महिला सक्षमीकरण होईल’, असे त्या म्हणाल्या. ‘आपण घेतलेला कुठलाही निर्णय आपण कशा प्रकारे पार पाडू शकतो, याचे धोरण महत्वाचे असल्याचे’ त्यांनी सांगून याठिकाणी मोठया स्त्रीशक्तीचे दर्शन झाल्याचे त्या म्हणाल्या.

दिव्यांग जलतरणपटू गीता काटकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ‘आपण कुठल्याही क्षेत्रात जरी काम करत असलो तरी इच्छाशक्तीच्या बळावर आपण असाध्य गोष्ट साध्य करु शकतो’. तसेच आपले जलतरण क्षेत्रातील अनुभव सांगून आपण असाध्य गोष्टी कशा आंतरराष्ट्रीय स्तरावर साध्य करुन यश मिळविल्याचे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले.

कार्यक्रमात महिलांचे एकपात्री प्रयोग

सहाय्यक आयुक्त (नियोजन) डॉ. संगीता हसनाळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची आयोजनामागची भूमिका विशद केली. तत्कालीन उप आयुक्त निधी चौधरी यांच्या प्रेरणेतून महापालिकेतील महिलांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महिलांनी एकपात्री प्रयोग तसेच विविध नाटयछटा सादर केल्या.

First Published on: March 7, 2020 9:46 PM
Exit mobile version