नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी इंटरपोलकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंटरपोलकडून याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहीण पूर्वी यांच्याविरोधातही नोटीस काढण्यात आली आहे.

नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला २०१९ मध्ये अमेरिकेत पाहण्यात आले होते. तपास यंत्रणांना सध्या ती नेमकी कुठे आहे याबद्दल खात्रीलायक माहिती नाही. दुसरीकडे पंजाब बँक घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत २७ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला ब्रिटनमधील न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. गतवर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून नीरव मोदी लंडनमधील वांड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

याआधी नीरव मोदीच्या कोठडीत ६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यावरुन सध्या सुनावणी सुरु आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेसोबतच इतर जवळपास कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतात वेगवेगळ्या यंत्रणांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याप्रकरणी नीरव मोदीसोबत मेहुल चोक्सीही फरार आहे.

ईडीने जुलै महिन्यात नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली होती. ईडीकडून नीरव मोदीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळीमधील समुद्र महल येथील चार फ्लॅट, फार्म हाऊस, अलिबागमधील जमीन, लंडनमधील फ्लॅट, युएईमधील घर आणि इतर गोष्टींचा समावेश होता.

First Published on: August 26, 2020 6:40 AM
Exit mobile version