गणिताचे आव्हान पेलण्यासाठीच दिली जेईई

गणिताचे आव्हान पेलण्यासाठीच दिली जेईई

सर्वसाधारणपणे सर्वच विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो. त्यातच मुलींना गणित झेपणार नाही असे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे मुलींना कमी लेखणार्‍यांना मुलीही गणित उत्तम पद्धतीने सोडवू शकतात हे दाखवून देण्यासाठीच मी जेईईची परीक्षा दिल्याचे महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिल्या आलेल्या ट्यूलिपने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले. जेईई परीक्षा देण्यामध्ये मुलींचे प्रमाण कमी असताना फक्त मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवण्यासाठी ट्युलिपने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे.

मुंबईतील कुलाबा येथे राहणारी ट्युलिप पांडे हिने जेईई परीक्षेत देशातून 79 वा क्रमांक तर महाराष्ट्रातून मुलींमधून पहिली आली आहे. ट्युलिप हिला खरे तर डॉक्टर व्हायचे होते. त्यानुसार तिने अभ्यासाची तयारीही केली होती. परंतु गणित विषय हा अवघड असतो, मुलींना गणित विषय झेपत नाही असे तिच्या ऐकण्यात आले. तसेच डॉक्टर होण्यासाठी जास्त गुण मिळवावे लागत असल्याने तिने आयआयटीमधून जेईई देण्याचा निर्णय घेतला. कारण गणित विषयात मुलीही उत्तम गुण मिळवून दाखवू शकतात हे तिला समाजाला दाखवून द्यायचे होते. त्यानुसार ट्युलिपने गणिताच्या अभ्यासाला सुरुवात केली. तिच्या या निर्णयाला पालकांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर ट्युलिपने गणिताचा जोरदार सराव करण्यास सुरुवात केली. जेईई परीक्षेत ट्युलिपचा 79 वा क्रमांक आला असला तरी तिने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच तिने गणित या विषयामध्ये तब्बल 81 गुण मिळवले आहेत.

ट्युलिपचे वडिल हे इंडियन डिफेन्स सर्व्हिसमध्ये इंजिनियर असल्याने त्यांची सतत देशाच्या विविध भागांमध्ये बदली होत असते. त्यामुळे ट्युलिपने आतापर्यंत सात शहरांमध्ये 11 शाळांमधून अभ्यास केला आहे. ट्युलिप ही मूळची उत्तर प्रदेशमधील असली तरी तिचे शालेय शिक्षण शिमला येथे तर कॉलेजचे शिक्षण भोपाळ झाले आहे. वर्षभरापूर्वी ट्युलिपचे वडिल सचिन पांडे याची मुंबईमध्ये बदली झाल्याने ट्युलिपने जेईईच्या परीक्षेसाठी मुंबईमधून अर्ज केला होता. वडिलांची सतत बदली होत असल्याने प्रत्येकवेळी नवनवीन चेहर्‍यांशी ओळख होत असे. नवीन प्रदेशामध्ये राहायला गेल्याने थोडेसे जुळवून घेण्यात अडचणी येत असे. पण मी हे आव्हान स्वीकारून त्याचा कोणताही परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ दिला नसल्याचे ट्युलिपने सांगितले. अभ्यासाचा तणाव कमी करण्यासाठी मी नेहमी फिरायला जाणे, कविता लिहिणे व भरतनाट्यम करत असे. त्यामुळे मला भरपूर एनर्जी मिळत असे. तसेच माझे आई बाबा व शिक्षकांकडून मला नेहमीच प्रोत्साहित करण्यात येत असे ट्युलिपने सांगितले.

नकारात्मक विचार मनात येऊ नये यासाठी स्वत:ला नेहमी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आपण जे काही करू ते सर्वोत्कृष्ट असले पाहिजे याकडे की कटाक्षाने लक्ष देत असे. अभ्यास करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी योग्य आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.
– ट्युलिप पांडे, महाराष्ट्रातून प्रथम आलेली विद्यार्थिंनी

First Published on: June 15, 2019 5:05 AM
Exit mobile version