कल्याणात भामट्याचा प्रताप! थेट भारत सरकारच्या राजपत्राचीच नकल!

कल्याणात भामट्याचा प्रताप! थेट भारत सरकारच्या राजपत्राचीच नकल!

तुम्हाला भारत सरकारच्या राजपत्रावर लिहिलेलं कोणतं पत्र आलं, तर त्यावर सरकारी कागदपत्र म्हणून विश्वास ठेऊ नका. कारण कदाचित ते राजपत्रच बनावट असण्याची शक्यता आहे. कल्याणमध्ये असा प्रकार समोर आला असून एका भामट्याकडून पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं बनावट लेटरपॅड, भारत सरकारच्या सोनेरी नावाचं आणि राजमुद्रा असलेलं विजिटिंग कार्ड, ह्युमन राईट्स कमिशन, महाराष्ट्र प्रेसिडेंटचं आयकार्ड आदी बनावट कागदपत्रं मोठ्या प्रमाणावर हस्तगत केली आहेत. लालमण पांडे असं या भामट्याचं नाव असून या कागदपत्रांचा तो गैरवापर करत असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. लालमणला जरी पोलिसांनी अटक केली असली, तरी त्याचा दुसरा साथीदार साले गुलखान मात्र फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

‘लालमणी पांडे गुरुजी, भारत सरकार’!

कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितलं की, ‘लालमणी नामक इसम हा नवी दिल्लीतील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नावाचा गैरवापर करीत असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कल्याण पूर्वेतील दुर्गा माता रोडवरील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी ‘लालमणी पांडे गुरूजी, हिंदी अॅडवायझरी बोर्ड मेंबर, भारत सरकार, नवी दिल्ली’ असे लेटरहेड आढळून आले. तसेच भारत सरकारच्या सोनेरी नावाचे आणि राजमुद्रा असलेले लेटरपॅड, विजिटिंग कार्ड, ह्युमन राईट्स कमिशन, महाराष्ट्र प्रेसिडेंटचे आयकार्ड आदी आढळून आले. याप्रकरणी सखोल चौकशी केली असता ही कागदपत्रं आणि कार्ड बनावट असल्याचं पोलिसांना आढळून आलं.


हेही वाचा – सेहवागच्या पत्नीची बिझनेस पार्टनरकडून फसवणूक

फसवणूक झाल्यास पोलिसांना कळवा!

पोलिसांनी लालमन पांडे याला अटक केली आहे. दरम्यान, लालमण विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ४२०, ४६५, ४६८, ४७१, तसेच दि इम्बालेम्स अॅण्ड नेम्स अॅक्ट १९५० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोळसेवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पानसरे यांनी केले आहे.

First Published on: July 23, 2019 6:42 PM
Exit mobile version