अतिधोकादायक इमारती पाडण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश

अतिधोकादायक इमारती पाडण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश

डोंबिवली येथील अतिधोकादायक इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पडून विकास विनय फडके या रहिवाशाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली असतानाच, आता पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अतिधोकादायक इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक इमारती अतिधोकादायक, धोकादायक म्‍हणून घोषित करण्‍यात आल्‍या आहेत.

सततच्‍या अतिवृष्‍टीमुळे या अतिधोकादायक, धोकादायक इमारती कोसळून जिवीत वा वित्‍तहानी होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, यासाठी आयुक्तांकडून या सूचना करण्यात आल्या आहेत. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या ‘ब’ प्रभागातील गिरी निवास या सन १९७१ सालातील अतिधोकादायक इमारत आहे. ही इमारत तोडण्याबाबत मा. न्‍यायालयाचा मनाई हुकूम असल्‍याने सदर बाब मा. न्‍यायालयाचे निदर्शनास आणून दिली असून सदर मनाई हुकूम उठवण्याकरीता शासनाच्‍या अध्‍यादेशाच्‍या संदर्भाने मा. न्‍यायालयाचे आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्‍ते यांच्‍या पथकाकडून गुरुवारी ही अतिधोकादायक इमारत निष्‍कासित करण्‍यात आली. ३ मजली असलेल्‍या या अतिधोकादायक इमारतींमध्‍ये १८ भोगवटादार होते. परंतू पो‍लीसांच्‍या मदतीने सदर इमारत रिकामी करुन जेसीबी आणि पोकलनच्‍या साहाय्याने गुरुवारी सदर इमारत तोडण्‍यात आली.

First Published on: August 8, 2019 10:39 PM
Exit mobile version