मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार – महापौर किशोरी पेडणेकर

मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार – महापौर किशोरी पेडणेकर

आजपासून मुंबई महापालिकेचा, महापौरपदाचा, नगरसेवकांचा कार्यकाळ जरी संपुष्टात येणार असला तरी निवडणूक होऊन नवीन महापौर निवडून येईपर्यंत मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार आहे. उद्यापासून माझी नवीन कारकीर्द सुरू होणार आहे, अशी माहिती मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. चौदाव्या मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याच्या प्रित्यर्थ मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महापौर बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत वरीलप्रमाणे माहिती दिली.

कायदा व कागदाची लढाई

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनाप्रणित महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या घरांवर, कार्यालयांवर ईडी, इन्कम टॅक्स खात्याकडून धाडी पडल्या व पडत आहेत. ज्यांच्यावर धाडी पडल्या किंवा धाडी पडणार आहेत, त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिलेली असते किंवा दिली जाते मात्र त्यांनी ऑफर नाकारली तर कारवाई होते आणि ऑफर स्वीकारली तर ते भाजपमध्ये जाऊन साधू झाले, शुद्ध झालेत. मात्र आम्ही शिवसैनिक असून यशवंत जाधव हे तर भीम सैनिक असून ते लढणारे आहेत. हा सर्व प्रकार कायदा व कागदाची लढाई आहे.

राणेंवरील कारवाई कायदेशीर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू बंगल्यात अनधिकृत काम झाले की नाही हे पालिका बंगल्याचा प्लॅन तपासून ठरवेल. जर ते काम बेकायदेशीर असेल तर कायद्याने त्याबाबत निर्णय होऊन कारवाई होईल. ते राणे व पालिका हे बघून घेतील. मी त्या भानगडीत पडणार नाही, असे महापौरांनी सांगितले.

मुंबईत शिवसेनेचीच सत्ता व महापौरही

मुंबईत सत्ताधारी शिवसेनेने गेल्या २५ वर्षात भरपूर विकास कामे केलेली असून मुंबईकर शिवसेनेलाच पुन्हा सत्ता देतील. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल व शिवसेनेचाच महापौर निवडून येईल, असे महापौरांनी सांगितले.

मुख्यमंत्री नारायण राणेंना फोन करणारच नाहीत

दिशा सालीयन हिच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान करणारे केंद्री मंत्री नारायण राणे यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर राणे यांनी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला, असा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याबाबत विचारणा केली असता महापौर किशोरी पेडणेकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राणेंना फोन करणारच नाहीत. जर राणे यांचे आरोप खरे असतील तर त्यांनी याबाबत पुरावे द्यावेत, असे म्हटले आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर; मुंबई, ठाण्याची निवडणूक लांबणीवर?


 

First Published on: March 7, 2022 9:06 PM
Exit mobile version