रेल्वेच्या कोपर पुलाचा वाद : शिवसेना नगरसेवकाचा रेल रोको आंदोलनाचा इशारा

रेल्वेच्या कोपर पुलाचा वाद : शिवसेना नगरसेवकाचा रेल रोको आंदोलनाचा इशारा

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद करून दोन महिले उलटले मात्र अजूनही कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी केली. पाहणी दरम्यान पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच पुलावरून रूग्णवाहिका व दुचाकी वाहतूक सुरू करावी अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसवेक म्हात्रे यांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेच्या कोपर पुलाचा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किती दिवस पूल बंद ठेवणार? – म्हात्रे

डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर पूल लोखंडी बॅरिगेट्स लावून १५ सप्टेंबर रोजी बंद करण्यात आला. कोपर पूल बंद करण्यात आल्याने शहरातील वाहतुक कोंडीमध्ये वाढ झाली आहे. शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी ही वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवली आहे. मात्र ठाकुर्लीचा पूल अरुंद असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच वळसा घालून जावे लागत आहे. पश्चिमेला महापालिकेचे शास्त्रीनगर रूग्णालय आहे. मात्र पूर्वेतील रूग्णांना शास्त्रीनगर रूग्णालयात येण्यासाठी वळसा घालून यावे लागते, त्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे किती दिवस पूल बंद ठेवणार? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यातच कल्याणचा पत्रीपुल, दुर्गाडीपूलाचे काम संथगतीने सुरू असतानाच डोंबिवलीचा कोपरपूल बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरसेवक म्हात्रे यांनी पुलावरून रूग्णवाहिका व दुचाकी वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे. कोपर पुलाचे काम तातडीने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास त्रस्त डोंबिवलीकरांच्या सहनशक्तीचा बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: November 19, 2019 5:21 PM
Exit mobile version