Lata Mangeshkar : लतादीदींच्या प्रभू कुंज निवासस्थानी, शिवाजी पार्कात मोठा पोलीस बंदोबस्त, पालिकेची तयारी सुरू

Lata Mangeshkar : लतादीदींच्या प्रभू कुंज निवासस्थानी, शिवाजी पार्कात मोठा पोलीस बंदोबस्त, पालिकेची तयारी सुरू

लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज ब्रीच कॅंडी रूग्णालय येथे रविवारी निधन झाले. मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे लतादीदींचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. ब्रीड कॅंडी हॉस्पिटल येथून त्यांचे पार्थिव दक्षिण मुंबईच्या पेड रोड येथील प्रभू कुंज या राहत्या घरी प्रभू कुंज येथे ठेवण्यात येणार आहे. सध्या प्रभू कुंज येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साधारणपणे तीन ते चार तास इतक्या कालावधीसाठी अंत्यदर्शनासाठी घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता लतादीदींवर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच ध्वजदेखील अर्ध्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली आहे.

देशातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींची हजेरी लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इंडस्ट्री, बॉलिवुड, राजकीय क्षेत्र तसेच अनेक चाहत्यांकडून या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महत्वाच्या रस्त्यावर मुंबईतील वाहतूक व्यवस्थाही वळवण्यात आली आहे. मुंबईतील पेडर रोड येथे व्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेता, याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांची वाहतूक वळवण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात येणाऱ्या वाहतुकीतही काही बदल करण्यात आले आहेत. दादरमध्येही वाहतूक विभागाकडून रस्ते वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथील मैदानात लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसारच शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणात या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी खुद्द पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील तयारीचा आढावा घेतला. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही मोठ्या प्रमाणातील व्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेता, चोख बंदोबस्त ठेवण्यासाठीची तयारी केली आहे. मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर यांनीही शिवाजी पार्क मैदानातील तयारीचा आढावा घेतला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीचकॅंडी हॉस्पिटल येथे हजर झाल्याची माहिती आहे. याआधी मुख्यमंत्री पेडर रोड येथील निवासस्थानी उपस्थित राहणार अशी माहिती होती. मुख्यमंत्र्यांच्या अंत्यदर्शनानंतर काही वेळाने लतादीदींचे पार्थिव हे ब्रीचकॅंडीहून प्रभू कुंज या राहत्या निवासस्थानी निघाले आहे.

शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणात लतादीदींचे चाहते गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेता, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील ४.३० वाजताच्या सुमारास मुंबईत लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी दाखल होणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाच्या तयारीकडे जातीने लक्ष घालून आहेत. मुंबईतील मोठी व्हीआयपी मुव्हमेंट लक्षात घेता, मुंबई पोलीस, मुंबई महापालिकेनेही या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच प्रभू कुंज या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


Lata Mangeshkar: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

First Published on: February 6, 2022 1:11 PM
Exit mobile version