मुंबईतील आठ पर्यटन स्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ

मुंबईतील आठ पर्यटन स्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ

मुंबई महापालिकेने शहरा व उपनगरातील प्रसिद्ध आठ पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शनिवारपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ केला आहे. यात प्रामुख्याने दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरातील गेट वे ऑफ इंडिया, काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग), अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथे स्नो वर्ल्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपरमध्ये किडझानीया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी लसीकरण सुरू केल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, विशेषत: लहान मुलांचे लसीकरण अधिकाधिक संख्येने होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
या लसीकरणात कोविशील्ड लस विचारात घेता, १८ वर्षावरील पात्र नागरिकांसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांच्यासाठी प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिला जाईल.

कोवॅक्सीन लस विचारात घेता, १५ वर्षावरील पात्र व्यक्तींसाठी पहिली मात्रा / दुसरी मात्रा, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) दिला जाईल. तसेच, १२ ते १५ वर्ष वयोगटातील पात्र मुलांकरीता कोरबेवॅक्स या लसीची पहिली मात्रा / दुसरी मात्रा दिली जाईल.
या आठही ठिकाणी सर्व लसी स्थळ नोंदणीद्वारे देण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

First Published on: May 28, 2022 9:16 PM
Exit mobile version