पाऊस गेल्यानंतरही मुंबईकर लेप्टोच्या विळख्यात

पाऊस गेल्यानंतरही मुंबईकर लेप्टोच्या विळख्यात

पाऊस गेल्यानंतरही मुंबईकर लेप्टोच्या विळख्यात

यंदा पडलेल्या पावसादरम्यान आलेल्या लेप्टोची समस्या पाऊस गेल्यानंतरही कायम आहे. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये थांबून-थांबून झालेल्या पावसामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुंबईत लेप्टोच्या २६६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच, ११ जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला. २६६ रुग्णांपैकी ३२ रुग्णांची फक्त नोव्हेंबर महिन्यात नोंद करण्यात आली आहे. तर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, रोज एक व्यक्ती लेप्टोच्या विळख्यात अडकला आहे.

लेप्टो कशामुळे होतो?

लेप्टो हा आजार प्राण्यांच्या मलमूत्र मिसळलेल्या पावसाच्या पाण्याच्या संपर्कामुळे होतो. पायाच्या त्वचेला झालेल्या जखमांमधून हा संसर्ग होत असतो. त्यामुळे पायाच्या त्वचेची काळजी घेतली गेली पाहिजे. तसंच, यंदा मुंबईतही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. यादरम्यान अनेकदा मुंबईत पाणी साचलं. त्यातून वाट काढण्यासाठी अनेकांनी साचलेल्या पाण्यातूनच घरी जाण्याचा मार्ग शोधला. याच पाण्यातून चालल्यामुळे आणि खूप वेळ राहिल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता अधिक बळावते. यावर्षी जुलै महिन्यात या आजाराचे ७२, ऑगस्टमध्ये ४९ आणि सप्टेंबरमध्ये ५६ रुग्ण आढळले होते.

६ टक्क्यांनी वाढले रुग्ण

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये लेप्टोच्या रुग्णांमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये फक्त पाच लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले होते. पण, आता नोव्हेंबर २०१९ मध्ये ही संख्या वाढून ३२ वर पोहोचली आहे.

यावर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यंत राहिला. त्यामुळे, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. साचलेल्या पाण्यातून किंवा मातीतून चालल्यामुळे आणि जर त्यात चार पायी जनावरांचे मलमूत्र मिसळलं असेल तर लेप्टो होण्याची शक्यता असते. शरीरावर जखमा असल्यास त्या जखमेतून संसर्ग होण्याची शक्यता असते. अनवाणी चालल्यामुळेही संसर्ग होऊ शकतो.
-डॉ. पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महापालिका
First Published on: December 22, 2019 3:14 PM
Exit mobile version