मेट्रोच्या कामामुळे माहीमची इमारत झुकली!

मेट्रोच्या कामामुळे माहीमची इमारत झुकली!

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाचं काम मुंबईत ठिकठिकाणी चालू आहे. शितलादेवी भूमिगत स्टेशनाचं काम हे माहीम पश्चिम येथील एल. जे. रोडवर चालू असून, या कामामुळे शनिवारी रात्री तिथे असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ नावाच्या एका इमारतीला मोठे तडे गेले आणि इमारत एका बाजूला झुकली. या इमारतीत २५ कुटुंब राहत असून तिथे चार दुकानं देखील आहेत. या सगळ्यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एमएमआरसीएल) इमारत रिकामी करण्यास सांगितलं. लोकांना राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून एमएमआरसीएलनं एका हॉटेलमध्ये बुकिंग करून दिलेलं आहे. लक्ष्मी निवास जवळ असलेल्या ‘समान ताज’ आणि ‘मेहेर मंजिल’ या इमारतींवर देखील मेट्रोच्या कामाचा परिणाम झालेला आहे. घराला तडे गेल्यामुळे आपल्या सुरक्षिततेची हमी वाटत नसल्याची प्रतिक्रिया इथले रहिवाशी देत आहेत.

शनिवारी मध्यरात्री मेट्रोचं काम सुरू असताना लक्ष्मी निवासातील रहीवाशांना भूकंपासारखे धक्के बसू लागले आणि सिलींगला तडे देखील पडले असं तेथील रहिवाशी म्हणाले. रहिवाशांनी रात्रीच्या सुमारास एक जोरदार आवाज ऐकला आणि तळ मजल्यावर असलेल्या दुकानाचे काचेचे दरवाजे देखील तुटले. नंतर इथल्या रहिवाशांना समजलं की इमारतीला तडे गेले आहेत. ही इमारत ५० वर्ष जुनी असून दोनदा म्हाडानं त्याची दुरुस्ती देखील केली होती.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भूमिगत स्टेशनचं काम सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया एमएमआरसीएलकडून देण्यात येत आहे. या सर्व रहिवाशांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांना नक्की किती दिवस तिथे राहावं लागणार आहे? इमारतीला तडे जाण्यासाठी कोण जबबादार आहे? मेट्रोच्या कामामुळेच तडे गेले हे एमएमआरसीएल मान्य करणार का? या प्रश्नांची उत्तरं मात्र पीडित रहिवाशांना अद्याप मिळालेली नाहीत.

First Published on: November 11, 2019 6:11 PM
Exit mobile version