माहुलला अनुवंशिक आजारांची लागण

माहुलला अनुवंशिक आजारांची लागण

रेश्मा बनसोडे त्वचेचे आजार झाले आणि तिच्या मुलीला तोच आजार जडला

रिफायनरी कंपन्या, केमिकल फर्टिलायझर कंपन्यांमुळे माहुल येथील हवेत घातक रासायनिक घटकांचे प्रमाण वाढले आहे. हवा व पाण्याच्या प्रदुषणामुळे येथील नागरिक घसा, डोळे, हृदयविकार, केस गळणे श्वसनाचे आजार व त्वचारोग यामुळे त्रस्त झाले होते. त्यातच आता या परिसरात जन्माला येणार्‍या बाळांना जन्मत:च त्वचारोग व श्वसनाचे आजार होत आहेत. हे आजार दूषित हवा आणि पाण्यामुळे त्यांच्या आईवडिलांना होत असून, त्यातून ते मुलांना होत असल्याचे उघड झाले आहे.

माहुल येथील इमारत क्रमांक 42 मध्ये राहत असलेले रवींद्र हनुमंत बनसोडे वर्षभरापूर्वी येथे राहण्यास आले. चांदिवलीतील शिवशक्ती पाईपलाईन येथून त्यांना पालिकेने येथे स्थलांतरित केले आहे. माहुल येथे राहायला आले त्यावेळी त्यांची पत्नी रेश्मा बनसोडे ही गर्भवती होती. बनसोडे कुटुंबीय येथे राहायला आल्यानंतर काही दिवसातच रेश्मा यांना येथील दूषित हवा आणि पाण्याचा त्रास होऊ लागला होता. त्यांच्या अंगावर लाल चट्टे पडून त्यांना त्वचारोग झाला होता. त्यातच त्यांना अर्पिता ही गोड मुलगी झाल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र काही दिवसातच अर्पिताच्या अंगावर लाल चट्टे उठल्याने त्यांनी डॉक्टरांना दाखवले. आईला असलेल्या आजारामुळे तिला ही अ‍ॅलर्जी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अ‍ॅलर्जी होण्यासाठी हवेतील रासायनिक घटक कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी रेश्मा बनसोडे यांना सांगितले. मला झालेल्या त्वचेच्या आजारामुळे अर्पिताला आजाराची लागण झाल्याचे ऐकून मला धक्काच बसल्याचे रेश्मा बनसोडे म्हणाल्या.

अर्पिताच्या त्वचारोगावर लागणार्‍या मलमाचा खर्च चार दिवसाला 500 ते 700 रुपये आहे. तसेच परिसरात दवाखाना किंवा डॉक्टरची सोय नसल्याने तिला घाटकोपरला राजावाडी किंवा केईएम हॉस्पिटलला न्यावे लागते. बसने गेल्यास 100 रुपये तर रिक्षाने गेल्यास 350 रुपयांपर्यंत खर्च येतो. रवींद्र बनसोडे हे इंड्स बँकेत ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. त्यांना 15 हजार रुपये वेतन आहे. यामध्ये घरखर्च व मुलीच्या औषधाचा खर्च परवडत नाही, असे रेश्मा बनसोडे यांनी सांगितले.
अर्पिताप्रमाणेच याच परिसरात नुकत्याच जन्मलेल्या तीन ते चार मुलांना आईकडून त्वचेची अ‍ॅलर्जी झाल्याचे उघडकीस आले आहे. वंश मल्होत्रा या चार महिन्याच्या मुलालाही हवेतील घातक रासायनिक घटकामुळे जन्मत:च श्वसनाचे व त्वचेचे आजार झाले होते.

घातक रासायनिक घटकामुळे वंशला झालेल्या श्वसनाच्या आजाराचा धसका घेऊन त्याच्या आईवडिलांनी माहुल सोडून डोंबिवलीला राहायला गेल्याचे परिसरातील सुनीता पवार यांनी सांगितले. सुनीता पवार या माहुलमधील हवेतील घातक रासायनिक घटकामुळे अनेक दिवसांपासून त्वचेच्या आजाराने त्रस्त आहेत. माहुलमध्ये असलेल्या 72 इमारतींमध्ये राहण्यास आलेल्या प्रत्येक घरातील व्यक्ती ही त्वचारोगाने ग्रस्त आहे. माहुल परिसरात असलेल्या बीपीसीएल, एचपीसीएल, फर्टिलायझर कंपनी यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दूषित रासायनिक घटक सोडले जातात. त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

माहुल परिसरात जानेवारी 2018 मध्ये दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला दिवसाला 40 रुग्ण येत असत. आता सुमारे 70 ते 80 रुग्ण येतात. यामध्ये त्वचारोग, सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक असतात. क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये एमडीआरचे रुग्ण अधिक असतात. एसडीआरचा रुग्ण असल्यास त्याला आम्ही शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवतो.
– डॉ. सुशांत बगाडे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, माहुल व्हिलेज.

First Published on: August 10, 2018 5:30 AM
Exit mobile version