मुंबईकरांच्या सेवेत धावणार कोट्यावधींचे डंपर

मुंबईकरांच्या सेवेत धावणार कोट्यावधींचे डंपर

मुंबईत आपत्कालीन सेवेप्रसंगी उपयोगी पडणारे डंपर भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका ३कंत्राटदारांना ७ वर्षांसाठी तब्बल २२ कोटी ३४ लाख रुपये मोजणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईत अधूनमधून धोकादायक इमारती, घरे, दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यावेळी कोसळलेली दरड, इमारतीचे डेब्रिज, बांधकाम उचलण्यासाठी डंपरची आवश्यकता मोठया प्रमाणात भासते. पालिकेकडे २००७ मध्ये स्वतःच्या मालकीचे डंपर होते. मात्र त्यांची मुदत २०१५ मध्ये संपल्याने ते कालबाह्य झाले. त्यामुळे पालिकेने तेव्हापासून नवीन डंपर खरेदी न करता भाडे तत्वावर डंपरसेवा घेण्यास सुरुवात केली. पालिकेने भाडे तत्वावर घेतलेल्या डंपरचा कंत्राट कालावधी सप्टेंबर २०२०मध्ये संपुष्टात आलेला आहे.

त्यामुळे आता पुन्हा नव्याने डंपर सेवा भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे ; मात्र यावेळी तब्बल ७ वर्षांसाठी कंत्राटदारांकडून डंपर सेवा भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे. २४ विभागांसाठी ही डंपर सेवा भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे. प्रत्येकी ३ विभागाचा एक गट याप्रमाणे ८ गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक एका विभागात दर दिवशी हा डंपर १२ तासांच्या २ पाळ्यात सेवा देणार आहे. त्यानुसार, विभाग ‘ए बी ई’ मध्ये मे. एम के इन्टरप्राईजेस या कंत्राटदाराकडून डंपर सेवा घेण्यात येणार असून त्यास प्रति डंपरसाठी २ हजार ३६० रुपये दर देण्यात येणार आहेत. ७ वर्षांसाठी त्यास ४ कोटी ३२ लाख ८६ हजार ७८० रुपये देण्यात येणार आहेत. तर विभाग ‘सीडीजी’ मध्ये मे.सुपरवेज या कंत्राटदाराकडून डंपर सेवा घेण्यात येणार असून त्यास प्रति डंपरसाठी २ हजार ३७३ रुपये दर देण्यात येणार आहेत. ७ वर्षांसाठी त्यास ४ कोटी ३५ लाख २५ हजार २२४ रुपये देण्यात येणार आहेत.

विभाग ‘एच/पूर्व ,एच/पश्चिम, के/पूर्व’ मध्ये मे.सुपरवेज या कंत्राटदाराकडून, विभाग ‘एल,एम/पूर्व,एम/पश्चिम’ मध्ये मे.सिटी या कंत्राटदाराकडून, तसेच, ‘ एन,एस,टी’ यामध्ये,सिटी कंत्राटदाराकडून डंपर सेवा घेण्यात येणार असून या तिन्ही कंत्राटदारांना प्रति डंपरसाठी २ हजार ४८४ रुपये दर देण्यात येणार आहेत. ७ वर्षांसाठी त्यास प्रत्येकी ४ कोटी ५५ लाख ६१ हजार १७० रुपये देण्यात येणार आहेत. एकूण या पाच कंत्राटकामांसाठी पालिका कंत्राटदारांना दरवर्षी कंत्राट रकमेत ५% , १०% , १५% आणि २०% वाढ देऊन एकूण २२ कोटी ३४ लाख ९५ हजार ५१४ रुपये देणार आहे.

First Published on: January 12, 2021 10:10 PM
Exit mobile version