इनकी तो निकल पडी; वर्षाचा पगार दीड कोटी रुपये

इनकी तो निकल पडी; वर्षाचा पगार दीड कोटी रुपये

प्रातिनिधिक फोटो

‘आयआयटी’ मुंबईच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्याआधीच अनेक कंपन्यांनी जॉब ऑफर केला आहे. त्यातही मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपनीने विद्यार्थ्यांना सर्वाधिक पॅकेज ऑफर केलं आहे. मायक्रोसॉफ्टने आयआयटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल दीड कोटी रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली आहे. याशिवाय अन्य काही कंपन्यांनी विद्यार्थ्यांना महिना २५ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्या आहेत. सध्या आयआयटीमध्ये ‘प्लेसमेंट’ इंटरव्ह्यूजचे वारे वाहू लागले आहेत. दरवर्षी साधारण याच काळात आयआयटीसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये अनेक नामवंत कंपन्या विद्यार्थ्यांसाठी जॉब ऑफर घेऊन येतात. त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या कंपन्या विद्यार्थ्यांना ‘हायर’ करतात म्हणजेच त्यांची नोकरीसाठी निवड करतात. मात्र, यंदाच्या वर्षी मायक्रोसॉफ्टने दिलेल्या दीड कोटी रुपये पगाराच्या घसघशीत ऑफरमुळे ‘आयआयटीच्या विद्यार्थ्यांची तो निकल पडी’ अशीच स्थिती झाली आहे.

मायक्रोसॉफ्टचा ‘परदेशी’ जॉब

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने ऑफर केलेला हा गलेल्लठ पगाराचा जॉब जरी भारतीय विद्यार्थ्यांसाठी असला, तरी त्यांचं जॉब लोकेशन अमेरिका असेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या अमेरिकेतील शाखेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्यावर्षी इंटरव्ह्यू देण्यापूर्वीच १५६ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रस्ताव आले होते. विद्यार्थ्यांना एकापाठोपाठ एक इंटरव्ह्यूज द्यावे लागू नयेत आणि कंपन्यांनाही निवड करणं सोपं जाव या उद्देशाने, आयआयटीने यावर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूंना सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या होत्या. इच्छुक कंपन्यांना या परीक्षेच्या गुणांची यादी देण्यात आली. या यदींच्या आधारेच विद्यार्थ्यांपुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यातील १२६ विद्यार्थ्यांनी नोकरी स्वीकारली आहे. यंदा पहिल्या तीन दिवसांमध्ये २७५ कंपन्यांचे नोकरीचे ८०० प्रस्ताव आयआयटी मुंबईकडे आले आहेत. त्यासाठी संस्थेतील १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

First Published on: December 4, 2018 8:59 AM
Exit mobile version