उर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्यावरून मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस!

उर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्यावरून मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस!

मुंबई काँग्रेस

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या ६ महिन्यांत काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणामुळेच राजीनामा देत असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं. त्यावरून आता मुंबई काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा यांनी अजून एक माजी अध्यक्ष असलेल्या संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी योग्य भूमिका मांडली असून त्यांच्या पराभवासाठी उत्तर मुंबईतल्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. ट्वीट करून त्यांनी संजय निरूपम यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘उर्मिलांच्या मताशी मी सहमत’

उर्मिला मातोंडकर यांना आपण पूर्णपणे पाठिंबा दिल्याचं मिलिंद देवरा या ट्वीटमध्ये म्हणतात. ‘उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय उर्मिला मातोंडकर यांनी घेतल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. त्यांना ज्यांनी पक्षात आणलं (संजय निरुपम), त्यांनीच उर्मिला यांचा विश्वासघात केला. त्यामुळे उत्तर मुंबईच्या नेत्यांना पराभवासाठी जबाबदार धरलं पाहिजे या त्यांच्या मताशी मी सहमत आहे’, असं देवरा या ट्वीटमध्ये म्हणतात.


हेही वाचा – काँग्रेस नेत्यांमुळेच माझा पराभव-उर्मिला मातोंडकर

काँग्रेसमध्ये पुन्हा वाद सुरू होणार?

लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. ‘काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची अकार्यक्षमता, नियोजनशून्यता, कार्यकर्त्यांशी गैरवर्तणूक आणि निधीची कमतरता यामुळेच निवडणुकीत आपला पराभव झाला. प्रचार संयोजक संदेश कोंडविलकर, पदाधिकारी भूषण पाटील आणि जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राले यांनी अपेक्षित मदत केली नाही’, असा स्पष्ट आरोप उर्मिला मातोंडकर यांनी या पत्रामध्ये केला होता. या पत्राचा मजकूर नंतर माध्यमांपर्यंत देखील पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरांनी अप्रत्यक्षपणे संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधल्यामुळे मुंबई काँग्रेसमधल्या वादाचं शमलेलं वादळ पुन्हा उठण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

First Published on: September 10, 2019 7:30 PM
Exit mobile version