५ हजार शेतकऱ्यांसह मनसेचा ठामपावर मोर्चा

५ हजार शेतकऱ्यांसह मनसेचा ठामपावर मोर्चा

नौपाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्याला कोणतेही कारण नसताना, त्यांच्याजवळ रितसर परवानगी असताना देखील त्याच्यावर कारवाई करून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या ठाणे महानगर पालिकेवर १७ मे रोजी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. हा मोर्चा ठाण्यातील गावदेवी मैदानापासून सुरु होऊन ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयावर धडक देणार आहे. या मोर्चामध्ये सुमारे पाच हजारहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा देखील सहभाग असणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाणे महानगर पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. रात्री आठ वाजता अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास दक्ष असताना ठाण्यातील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर का कारवाई होत नाही, असा सवाल करीत यामागे राजकारण असून या विरोधात पालिकेला जाब विचारला जाईल. तसेच ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात केवळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी नियमित स्टॉल्सची निर्मिती करावी. ग्रामीण भागातील सुमारे १०० आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी हे स्टॉल्स निर्गमित करण्यात यावेत. ही या मोर्चात प्रमुख मागणी असणार आहे. तसेच ठाण्यातील ज्या शेतकऱ्याच्या स्टॉलवर ठाणे महापालिकेने कारवाई केली त्याच्याकडून या विभागातील नगरसेविकाने सुमारे २० हजार रुपयांची मागणी केली. याची चौकशी करून त्या नगरसेविकेवर देखील कारवाई करावी. तसेच समृद्धी महामार्गाच्या जमिन अधिग्रहणात जो भ्रष्टाचार होत आहे. त्याबाबत अनेक शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनाही तात्काळ न्याय मिळावा. या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अनेक संघटना सहभागी होणार आहेत. शेतकरी कामगार संघटनेचे संतोष नागरगुजे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शिरीश सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रातले ग्रामसेवक, सरपंच आदी मान्यवर देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.

ठाण्यातील पाणी समस्येला राजकारणी जबाबदार

ठाण्यातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याला जबाबदार ठाण्यातील राजकारणी आणि त्यांना पोसत असलेली टँकर लॉबी आहे. ठाण्यात जर पाणी नाही तर नवीन इमारतींना परवानगी का देण्यात येते. साकेतच्या मुख्य पाईप लाईनमधून हे टँकर भरले जातात आणि संपूर्ण शहराला पुरवले जातात, असे असेल तर ठाणेकरांनी टँकरमधून पाणी का घ्यावे?, असा प्रश्न निर्माण करीत अविनाश जाधव यांनी ठाण्यात १७ मे पासून पाणी प्रश्नावर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. एक दिवस टँकर बंद आंदोलन करून यामधील भ्रष्टाचारींना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार नाही कारण आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना वेळच नसतो. विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मनसेच्या वतीने ठाण्यातील सर्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर नंतर चर्चेसाठी बोलवू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मनसेला चर्चेसाठी पाचारण केलेले नाही याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळच नाही.  – अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष


वाचा – श्रमजीवीचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मोर्चा’

वाचा – ठाणे जिल्ह्यातील शहरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट


 

First Published on: May 15, 2019 5:38 PM
Exit mobile version