राज ठाकरे करणार राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’

राज ठाकरे करणार राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे येत्या ९ मार्च रोजी रंग शारदामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे महत्वाच्या राजकीय घोषणा करण्याची शक्यता आहे. ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा’ असे लिहिलेले पोस्टर्स सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही राज ठाकरे यांनी विरोधकांबद्दल भाष्य केले होते मात्र या कार्यक्रमात राज ठाकरे कोणते वक्तव्य करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला जाणार कार्यक्रम

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली, तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या शनिवारी, नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.काही दिवसांपासुन मनसे राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत येणार असल्याची चर्चा आहे. मनसेला यासंदर्भात राष्ट्रवादीने हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनीही आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत’ असे म्हटले होते. आता राज ठाकरे कोणता राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार याचे उत्तर येत्या शनिवारी मिळेल.

First Published on: March 5, 2019 3:36 PM
Exit mobile version