घरमहाराष्ट्रपाकशी चर्चा करायची संधी मोदींनी सोडू नये - राज ठाकरे

पाकशी चर्चा करायची संधी मोदींनी सोडू नये – राज ठाकरे

Subscribe

'इम्रान खान यांच्या प्रस्तावाचे हेतू स्वच्छ असतील तर पंतप्रधान मोदींनी ही संधी दवडू नये,' असं राज यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततापूर्ण चर्चेसाठी बोलवलं आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या चर्चा प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये’, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘पाकिस्तानची खरोखरच चर्चेची तयारी असेल तर त्यांनीच त्यादृष्टीने पहिलं पाऊल उचलायला हवं. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडावं आणि सीमारेषेवरचा गोळीबार त्वरित थांबवावा.’ ‘इम्रान खान यांच्या प्रस्तावाचे हेतू स्वच्छ असतील तर पंतप्रधान मोदींनी ही संधी दवडू नये,’ असं राज यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी परित्रकात काय म्हटलंय?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देखील केलं होतं. या हल्ल्यात आपण आपले सीआरपीएफचे ४० जवान गमावले होते, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यकच होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं.
काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चेस तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केेली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवाने या चर्च पूणत्वाला जाऊ शकल्या नाहीत.
जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे. ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत ?
युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील  निष्ठूरपणे, म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचे वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.
पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमा रेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबलाच पाहिजे. जर या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल की इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत. आणि तसं घडलं तर मात्र श्री नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता कामा नये.
मी पुन्हा एकदा सांगतो की, युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -