मोनो ट्रॅकवर, पण तोट्यातच!!

मोनो ट्रॅकवर, पण तोट्यातच!!

Mono rail

मोनोरेलची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून अर्थात उद्यापासून मोनोरेल धावणार आहे. अनेक अडथळ्यांचा, टीकेचा सामना करत मोनोरेल तब्बल ९ महिन्यानंतर धावणार आहे. अनेक यंत्रणा आणि कंपन्यांना पायघड्या घालत देशातील पहिली मोनो सुरू करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, यानंतर देखील मोनोरेल तोट्यातच असणार आहे. त्यामुळे आगामी काळात मोनोची तिकीट दरवाढ अटळ असणार आहे. हे नक्की! त्यामुळे मोनोरेलने प्रवास करताना प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यावर मोनो शनिवारपासून धावणार आहे. तर दुसऱ्या टप्पा असलेल्या जीटीबी नगर ते जेकब सर्कल दरम्यान मोनो धावण्यासाठी २०१९ची वाट पाहावी लागणार आहे. सध्या वडाळा ते चेंबूर दरम्यान ५ रूपये, ७ रूपये, ९ रूपये आणि ११ रूपये तिकीट आहे. तर, आगामी काळात तिकीट दरामध्ये वाढ होणार असून ती १० रूपये, २० रूपये, ३० रूपये आणि ४० रूपये अशी असणार आहे.

संकटांचा सामना आणि टीकेचा भडीमार

फेब्रुवारी २०१४ साली वडाळा ते चेंबूर दरम्यान मोनो धावली. पण, त्यानंतर मोनो पुढे अनेक संकटं उभी राहिली. त्यामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होणे असो किंवा डब्यांना आग लागण्याचे प्रकार. यामुळे मोनोला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला. शिवाय, मोनोच्या उपयुक्ततेबद्दल देखील शंका उपस्थित केल्या गेल्या. तसेच काही बिल्डरांच्या हट्टापायी मोनोचा घाट घातल्याचा आरोप देखील केला गेला. स्कोमी आणि एलएण्डटी कंपनीकडे सध्या मोनोचे कंत्राट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तरी मोनो तोट्यातच आहे. तर, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनो फायद्यामध्ये असेल का? याबद्दल तज्ञ्जांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

डब्यांना वाळवी

एका मोनोरेलची किंमत तब्बल ४० कोटी रूपये आहे. पण अनागोंदी कारभारामुळे मोनोचे काही डबे खराब झाले आहेत. त्यांच्या दुरूस्तीची शक्यता मात्र धुसर आहे. त्यामुळे मोनोसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. त्यामुळेच संपुर्ण क्षमतेने आणि दुसऱ्या टप्प्यातील सेवा सुरू करणे एमएमआरडीएला शक्य नाही. दरम्यान, खर्च परवडत नसल्याचे कारण देत कंत्राटदार कंपनीनं फेरीमागे १८ हजारांची मागणी केली होती. एक समिती सदस्याच्या अहवालानुसार आता मोनोच्या प्रत्येक फेरीमागे वाढीव खर्चासाठी १० हजार ६०० रूपये देण्यास एमएमआरडीएनं संमती देखील दिली आहे. त्यामुळेच मोनोच्या खर्चात आणि तोट्यातही आणखी भर पडणार आहे. मोनोच्या रोज २१० फेऱ्या होतात. जुन्या दरानुसार दिवसाकाठी ८.४ लाख रूपये खर्च येतो. पण नव्या दरानुसार तोच खर्च आता २० लाखाच्या घरात जाणार आहे.

नियोजित वेळेनुसार मोनो धावणार

मोनोरेलची चेंबुर वडाळा दरम्यानची सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. मोनोच्या ट्रायल रनला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लवकरच नियोजित नव्या डेडलाईननुसार ही सेवा सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठी सूचनाही जारी करण्यात येईल अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. याआधी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी मोनोरेलच्या डब्यांमध्ये आग लागल्यानं मोनोची सेवा पूर्णपणे ठप्प होती. अखेर सेवा सुरळीत करायला मोनोला १ सष्टेंबरचा दिवस उजाडला आहे. सध्या फक्त मोनो रेल्वेचा पहिला टप्पा ८.८ किलोमीटर अंतराचा असा चेंबुर ते वडाळा दरम्यान सुरू होईल. तुर्तास तिकीटाचे दर वाढवण्यात येणार नाहीत. जुन्याच दराने मोनो रेल्वेची सेवा सुरू होत असल्याची ते म्हणाले. तर, मोनोचा दुसरा टप्पा पूर्ण व्हायला २०१९ उजाडेल असा अंदाज एमएमआरडीएमार्फत बांधण्यात आला आहे.

मोनोला आगीतून धडा

मोनो रेल्वेच्या १७ नोव्हेंबर २०१७ च्या आगीच्या घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनाने धडा घेतला आहे. अशा घटनांची पुरावृत्ती होऊ नये म्हणून हायकोर्टानेही मॉकड्रिल करण्याचा सल्ला फायर ब्रिगेडला दिला होता. तसेच फायर ब्रिगेडने काय अहवाल द्यावा असेही कोर्टाने सुचवले आहे. मोनोरेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या तसेच नियमित मॉकड्रिल करा असेही फायर ब्रिगेडने एमएमआरडीए प्रशासनाला स्पष्ट केले आहे.

First Published on: August 31, 2018 5:54 PM
Exit mobile version