CSMT bridge Collapse: ‘त्या’ गेल्या आणि कुटुंबाचा आधार हरपला

CSMT bridge Collapse: ‘त्या’ गेल्या आणि कुटुंबाचा आधार हरपला

जी टी हॉस्पिटल नर्स

तिन्ही परिचारिका प्रामाणिक, कणखर, कष्टाळू आणि स्वभावाने चांगल्या होत्या. कधीच कामाला नाही बोलायच्या नाहीत. नेहमीच हसरा चेहरा… तिन्ही परिचारिकांचं हे वर्णन सांगत होत्या जीटी हॉस्पिटलमधील सहकर्मचारी… नेहमीच एकमेकींचा चेहरा बघत संगनमताने काम करणाऱ्या नर्स अचानक हे जगच सोडून गेल्या यावर जीटी हॉस्पिटलमधील कोणत्याच व्यक्तीचा विश्वास बसत नाही.

सुदैवाने एक जण वाचला

सीएसएमटी पूल कोसळण्याच्या घटनेत अपूर्वा प्रभू, भक्ती शिंदे, रंजना तांबे या तीन परिचारिकांचा मृत्यू झाला तर जीटी हॉस्पिटलचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. चौघेही एकाच वेळेस जीटी हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीसाठी येत होते. पण, पूल कोसळला आणि या तीन परिचारिका कोसळल्या आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पण, पुरुष कर्मचाऱ्याने पुलावरुन लगेच उडी मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

कामावर येताना काळाने घाला घातला

या नर्सच्या जेष्ठ सहकर्मचाऱ्यांनी सांगितलं, “ तिन्ही परिचारिका स्वभावाने मनमिळावू होत्या. त्या गेली १०-१२ वर्षे हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्यामुळे नेहमीच त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. आमच्यातील नातं हे एका कुटुंबाप्रमाणे होतं. रात्री कामावर येताना ही दुर्घटना झाली आणि त्या आमच्यापासून खूप दूर गेल्या. असं काही अचानक होईल असं वाटलंही नव्हतं.”

कुटुंबाचा आधार गेला

जीटी हॉस्पिटलमध्ये १४ , ६ आणि ओटी मध्ये या तीन परिचारिका काम करत होत्या. या तीन परिचारिकांपैकी भक्ती शिंदे यांचं कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून होतं. त्यांचे दोन्ही भाऊ या जगात नाहीत त्यामुळे आपल्या मुलासह भावांच्या मुलांची जबाबदारीदेखील त्यांच्यावर होती. त्यांच्या जाण्यानं कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना ही या सहकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हौशी नर्स अपूर्वा गेल्याने झाले दु:ख

नसतेस घरी तू जेव्हा…अशा आशयाची रांगोळी महिला दिनाच्या निमित्ताने परिचारिका अपूर्वा प्रभू यांनी काढली होती. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक कार्यक्रमात आवडीने सहभागी होणाऱ्या हौशी नर्स अपूर्वा आमच्यापासून दुरावल्या. याचा खूप त्रास होतो. अपूर्वा यांना एक मुलगी आणि एक मुलगा असून ती दोघंही लहान आहेत.

तिघींसाठी सर्वांचे आश्रू अनावर

रंजना तांबे या दिव्यांग परिचारिका होत्या. जरी राऊंडला गेल्या तरी धडपडत जायच्या. कधीच कोणत्या कामाला त्यांनी नाही म्हटलं नाही. त्यामुळे, या तिन्ही परिचारिका खूप जवळच्या होत्या, असं सांगताना सहकर्मचाऱ्यांच्या भावना आणि अश्रू अनावर झाल्या. सीएसएमटीजवळील पूल दुर्घटनेत आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सनी या दुर्घटनेत जीव गमावला. त्यांना जीटी रुग्णालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

First Published on: March 15, 2019 8:28 PM
Exit mobile version