आत्महत्येची कहाणी डायरीच्या ३० पानांत

आत्महत्येची कहाणी डायरीच्या ३० पानांत

कफ परेड येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी गळफास लावून आत्महत्या

मुंबईत शुक्रवारी एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कफ परेडच्या शिवसृष्टीनगर मच्छीमार वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली. प्रवीण पटेल यांनी पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली. गरिबीला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पण घटनास्थळावरून पोलिसांना एक डायरी सापडली होती. ज्यामध्ये प्रविण यांनी आपल्या आयुष्याची सगळी कहाणी या डायरीत लिहिली आहे.

 

डायरीच्या ३० पानांवर आत्महत्येची कारणे

४० वर्षाच्या प्रवीण पटेल यांनी पत्नी वीणा प्रवीण पटेल(३५) आणि मुलगा प्रभू पटेल(११) यांच्यासह गळफास लावून शुक्रवारी रहात्या घरी आत्महत्या केली. प्रविण पटेल यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय होता. घटनास्थळी मिळालेल्या डायरीमध्ये प्रविण पटेल यांनी सुमारे तीस पाने लिहिलेली आहेत. त्यात आत्महत्या का करावी लागली याची बरीच कारणे त्यांनी लिहली आहेत. राहत असलेल्या घराची घरमालकीन आणि बऱ्याच शेजाऱ्यांनी कशाप्रकारे आम्हाला वारंवार त्रास दिला आणि त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मुलगी गेली तेव्हाच मी संपलो होतो

प्रवीण पटेल यांच्या ७ वर्षाची मुलगी प्रतिभाला कॅन्सर होता. टाटा हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांपूर्वी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. पण त्यानंतर आमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच आलं. प्रतिभा गेली तेंव्हाच मीसुद्धा संपलो होतो असा उल्लेख प्रवीण यांनी डायरीत केला आहे. ३० पानांच्या या डायरीत त्यांना मुंबईत आल्यापासून कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले ते सांगत अनेक शेजाऱ्यांनी भरपूर त्रास दिला आणि आम्हाला जगणे मुश्किल केल्याचे म्हटले आहे.

सहकुटुंबाचा पहिला आणि शेवटा फोटो

गेल्या तीन महिन्यापासून प्रवीण पटेल हे कोणाशी जास्त बोलत नव्हते. तसंच कोणाला घरीसुद्धा येऊ देत नव्हते. त्यांच्या स्वभावात खूप बदल झाला असल्याची माहिती त्यांच्या सहकारी मित्रांनी दिली आहे. मुलीच्या मृत्यूनंतरच त्यांनी ही सुसाईड नोट लिहायला सुरुवात केली असावी ज्यामध्ये लहानपणापासूनची सगळी कहाणी त्यांनी लिहिलेली आहे. डायरीत करण्यात आलेल्या आरोपांमध्ये घरमालकीन आणि ३ ते ४ शेजाऱ्यांची नावसुद्धा आहेत. डायरीच्या पहिल्याच पानावर आपल्या सहकुटुंबाचा एक फोटो त्यांनी चिकटवला असून हा पहिला आणि शेवटचा फोटो असल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे

त्यावेळी मला जाऊ दिले नाही आता मी कधीच जाणार नाही!

आत्महत्येपूर्वी प्रवीण पटेल यांनी आपल्या राहत्या घराच्या भिंतीवर हिंदीमध्ये एक संदेश लिहिलेला आहे. ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की “ज्यावेळी मी जात होतो त्यावेळी मला जाऊ दिले नाहीत आता मी इथून कधीच जाणार नाही ” असं भिंतीवर लिहिण्यात आलेले आहे. आपली पत्नी रीना आणि मुलगा प्रभू यांचे दोन्ही हात बांधलेल्या अवस्थेत गळफास घेतलेले मृतदेह पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेले होते. आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने आणि इतरांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण आपलं आयुष्य संपवत आहोत असं प्रवीण पटेल यांनी डायरीत लिहिलेलं आहे आणि आम्हाला त्रास देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आलेली आहे. पोलीसंकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

First Published on: June 23, 2018 8:46 PM
Exit mobile version