मुंबईतील विमानसेवेवरही पावसाचा परिणाम

मुंबईतील विमानसेवेवरही पावसाचा परिणाम

पावसामुळे विमानसेवेवर परिणाम (सौजन्य- यु ट्यूब )

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील विमान सेवेवरही झाला आहे. तब्बल ६८ विमानांचे वेळापत्रक कोलमडले असून विमानांच्या उड्डाणावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले असून रेल्वे आणि रस्ते वाहतूकी सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. सोमवारी दुपारनंतर मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या तसेच मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांनाच त्यांची सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज ज्या प्रवाशांनी फ्लाइट बुकींग केली आहे, त्यांना विमानाची सेवा सुरळीत आहे की नाही हे, पाहावे लागणार आहे.

‘विमानतळावर वेळेच्या आधी या’

पश्चिम महामार्गावर ट्रॅफिक (सौजन्य – एसटी)

एखादा मुंबईकर विमानाने प्रवास करत असेल तर त्याला विमानतळावर वेळेच्या आधी पोहोचणे गरजेचे आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून विमानतळापर्यंत वेळेत पोहोचणे प्रवाशांना त्रासदायक होऊ शकते. पावसामुळे रविवारीदेखील विमानाची सेवा ३० ते ३५ मिनीटं उशीराने होती. शिवाय डोमेस्टीक एअरपोर्टवरील मुख्य रनवे मार्ग देखभालीसाठी ३.४३ ते ४.१७ या कालावधीत बंद ठेवण्यात आला होता.

मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाचा इशारा (सौजन्य- झी न्यूज)

मुंबईत आजच्या दिवसाची सुरूवात मुसळधार पावसाने झाली असून दोन दिवसाच्या सुट्टीनंतर कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. स्कायमेट वेधशाळेने गेल्या २४ तासात २३१ मिमी पावसाची नोंद केली असून येत्या १२ तासांसाठीही सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन गाड्या धिम्या गतीने चालत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवाही प्रभावीत झाली असून लोकल १५ ते २० मिनीट उशीराने धावत आहेत. पावसामुळे साचलेले रेल्वे रूळावरील पाणी काढण्याचे काम प्रशासनाचे कामगार करत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील सायन, चिंचपोकळी आणि माटुंगा सारख्या स्थानकांवरील रेल्वे सेवेवर पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षा विभाग सज्ज

चुनाभट्टी, दादर, वडाळा, मालाड, कुर्ला, गावदेवी, सांताक्रूझ – चेंबूर लिंग रोड या परिसरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे येथील रस्ते वाहतूक मंदावली आहे. प्रशासनाने अग्निशमन विभाग, एनडीआरएफ आणि इतर सुरक्षा विभागांनाही आपतकालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

First Published on: June 25, 2018 4:18 PM
Exit mobile version