एक्झिट पोल मार्केटच्या पथ्यावर

एक्झिट पोल मार्केटच्या पथ्यावर

देशातील सर्व प्रमुख सर्वेक्षण संस्थांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये देशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज रविवारी व्यक्त केला. त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात मोठी तेजी आली. या तेजीने गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्समध्ये फक्त एक दिवसाच्या कामकाजात १४२१.९० अंक अथवा ३.७५ टक्क्यांची मोठी वाढ होऊन तो ३९,३५२.६७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक, निफ्टीत ४२१.१० अंकांची अथवा ३.६९ टक्क्यांची वाढ होऊन तो ११,८२८.२५ अंकांवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक ८.६४ टक्के, एसबीआय ८.०४ टक्के, टाटा मोटर्स ७.५३ टक्के, टाटा मोटर्स डीवीआर ६.८६ टक्के, यस बँक ६.७३ टक्क्यांनी वधारले. ते टॉप फाईव्ह शेअर्समध्ये सहभागी होते. तर निफ्टीवर अदानी पोर्ट्स १०.९९ टक्के, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स १०.६२ टक्के, इंडसइंड बँक ८.७७ टक्के, एसबीआय ८.३२ टक्के आण टाटा मोटर्स ७.५ टक्क्यांनी वधारले. त्या अगोदर सोमवारी सकाळी सेन्सेक्स ९४६.२४ अंकांनी तर निफ्टी २४४.७५ अंकांनी खुला झाला.

मुंबई शेअर बाजारात ४० कंपन्यांच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा सर्वात उच्च स्तर गाठला. त्या बजाज फायनान्स, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसआरएफ, टायटन, कोटक महिंद्रा आणि पीवीआर या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

तर बाजार अधिकच वधारणार
बहुतेक सर्वच एक्झिट पोलने एनडीएला बहुमतापेक्षा जास्त जागा दाखवल्या असल्यामुळे एनडीएचा मोठा विजय होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला एकट्यालाच बहुमत मिळाले तर शेअर बाजारात मोठी तेजी येईल, असे एचडीएफसी सिक्युरिटीचे रिटेल रिसर्च प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले.

२३ मेपर्यंत मोठ्या गुंतवणुकीची आशा
येत्या २३ मेपर्यंत निफ्टी ११,७०० अंकांच्या वर जाईल. मात्र निफ्टी त्या स्तरावर कायम राहिल की नाही हे भाजपला एकट्याला बहुमत मिळते की नाही यावर अवलंबून आहे. पण तोपर्यंत वित्तीय संस्था बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील अशी आशा आहे.

First Published on: May 21, 2019 5:37 AM
Exit mobile version