महापालिका कर्मचारी,अधिकार्‍यांची बदली आता ऑनलाईन

महापालिका कर्मचारी,अधिकार्‍यांची बदली आता ऑनलाईन

मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांची बदली केल्यांनतर, ज्या विभागांमध्ये त्यांची बदली केली जाते, त्याठिकाणी अनेक कर्मचारी, अधिकारी जाण्यास नकार देतात. बदलीचे आदेश काढल्यानंतरही, हे आदेश रद्द करून पुन्हा जुन्याच जागी किंवा महत्वाच्या विभागांमध्ये वर्णी लावून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून दबावतंत्र राबवले जाते. या अधिकारी ,कर्मचार्‍यांच्या या मनमानी कारभारालाच आळा घालण्यासाठीच महापालिकेने बदली आणि बढतीचे आदेशच यापुढे ऑनलाईन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऑनलाईन बदलीचे आदेश थेट सॅपद्वारे संगणकीय प्रणालीत समाविष्ठ होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आता अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना करता येणार नाही.

मुंबई महापालिकेने सेवानिवृत्तीनंतरच सर्व लाभ अधिकारी व कर्मचार्‍यांना ऑनलाईनद्वारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर्मचार्‍यांची बदली व बढतीचे आदेशही ऑनलाईन पध्दतीनेच जारी करण्याचा निर्णय घेतला. सध्या महापालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना बोलावून व्यक्तीश: बदलीचे तसेच बढतीचे आदेश दिले जायचे. परंतु बदली झाल्यानंतरही अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देत आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करतात. पण यापुढे ऑनलाईन बदली व बढतीचे आदेश काढल्यामुळे संगणकीय पध्दतीने ज्या विभागात बदली झाली आहे, त्या विभागाच्या हजेरी पटावर त्यांचे नाव समाविष्ठ होणार असून त्याचठिकाणी त्यांची बदलीच्या दिवसापासून हजेरी नोंद केली जाणार आहे. त्यामुळे बदलीनंतर जो कर्मचारी गैरहजर राहिल,त्याला आपल्या गैरहजेरीबाबतचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

महापालिकच्या सामान्य विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांनी याबाबत स्पष्ट करताना, यापुढे कुठल्याही कर्मचारी,अधिकार्‍याला व्यक्तीश: बदली तसेच बढतीचे आदेश दिले जाणार नाही. त्यांना यापुढे ऑनलाईनच बदलीचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगितले. यामुळे मोठ्याप्रमाणात कर्मचारी व अधिकार्‍यांचा हस्तक्षेप कमी होईल आणि सिस्टीमलाच बदली आदेश जोडले जाणार आहे. त्यामुळे सिस्टीमवरच बदलीच्या दिवसापासून कर्मचारी,अधिकार्‍याचे नाव संबंधित विभागाच्या हजेरीपटावर जोडले जाईल,असे त्यांनी सांगितले.

First Published on: November 11, 2019 1:33 AM
Exit mobile version