आता आमदारांचेही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

आता आमदारांचेही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

औरंगाबाद दंगलीच्या प्रश्नावर आमदारांचे मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन

औरंगाबाद दंगलीबाबत मुख्यमंत्री गंभीर नसल्याचा आरोप

जनतेचे प्रश्न वेळेत न सुटल्यामुळे सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नेहमीच आंदोलन होत असतात. मात्र जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून ज्या आमदारांना जनतेने निवडून दिलेले असते, त्यांनादेखील आता मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसावे लागले आहे. औरंगाबाद दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या मुस्लिम आमदारांनी वेळ मागितली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण यांनी मंत्रालयाच्या पायऱ्यावरच ठिय्या आंदोलन केले. तसेच औरंगाबाद दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री गंभीर नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

औरंगाबाद दंगलीमुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. त्यामुळे यावर चर्चा करून मार्ग काढावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व पक्षाच्या मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारलेल्या या आमदारांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. औरंगाबाद मध्ये गेल्या आठवड्यात किरकोळ कारणावरून दंगल उसळली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली होती. जवळपास १०० व्यापाऱ्यांची दुकाने जाळण्यात आली. यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेजही समाज माध्यमांवर व्हायरल झाले. याचा आधार घेत हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार, आसिफ शेख, अबू आझमी, इम्तियाज जलिल, वारीस पठाण या मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे वर्षा या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी वेळ मागितली.

मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यास वेळ दिला नसल्याच्या कारणास्तव या आमदारांनी मंत्रालयात येवून मंत्रालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलना नंतर, रात्री उशीरा चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाचारण केले असल्याचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून या आमदारांना देण्यात आला. त्या नंतर या आमदारांनी आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

First Published on: May 22, 2018 2:27 PM
Exit mobile version