नायरमध्ये उभारणार कॅन्सर सेंटर

नायरमध्ये उभारणार कॅन्सर सेंटर

नायर,केइएम,शीव या हॉस्पीटल्समध्ये मान्सून ओपीडी

कर्करोगावर उपचार करण्यासाठी मुंबईत परळ येथील टाटा हॉस्पिटल हे एकमेव आहे. या हॉस्पिटलमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने हॉस्पिटलवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नायर रुग्णालयात कर्करोग विभाग सुरू केला होता. या विभागाला रुग्णांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या हॉस्पिटलमध्ये सात मजली कॅन्सर सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तीन ते चार वर्षांत हे सेंटर सुरू होणार असून, या सेंटरमुळे कर्करोगग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

महापालिकेकडून रुग्णांना दिलासा

टाटा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी होत असलेल्या विलंबामुळे मुंबई महापालिकेने केईएम, सायन व नायर या महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये कर्करोग विभाग सुरु केले आहेत. मात्र या विभागांमध्ये सर्वच प्रकारचे उपचार करण्यात येत नाही. २०१३ मध्ये नायर हॉस्पिटलमध्ये कर्करोग विभाग सुरू करण्यात आला. या विभागात केमोथेरपी व सर्जरी करण्यात येत असल्याने रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नायरमध्ये स्वतंत्र कॅन्सर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाने महापालिकेकडे केली होती. त्याला महापालिका प्रशासनाने मान्यता देत टाटा हॉस्पिटलसोबत करार केला आहे. सेंटरचा आराखडा बनवून नायर हॉस्पिटलने पालिकेकडे प्रस्ताव पाठवला होता. परंतु हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सेंटरसाठी उभारण्यात येणारी सात मजली इमारत व अन्य एल आकारात उभारण्यात येणारी इमारत एकत्रित उभारावी अशा सूचना पालिकेने दिल्याने या इमारतीचा नव्याने आराखडा बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर पालिकेकडे मनुष्यबळ व अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासंदर्भातील प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळून टेंडर प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल. तसेच हे सेंटर सुरू होण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे लागतील, अशी माहिती नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

काय असेल सेंटरमध्ये

नायर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी व सर्जरी करण्याची सुविधा असणार आहे. तसेच विविध अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. त्यामुळे रुग्णांना टाटा हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. त्याचप्रमाणे सेंटरमध्ये एक पुरुष व एक स्त्री वॉर्ड असणार आहे.


-विनायक डिगे

First Published on: July 13, 2018 10:29 AM
Exit mobile version