शिवसेनेच्या सुनील राऊतांना उमेदवारी देऊ नका, भाजपची मागणी

शिवसेनेच्या सुनील राऊतांना उमेदवारी देऊ नका, भाजपची मागणी

Sunil Raut

शिवसेनेबद्दल जहरी टीका केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यावर शिवसैनिक अडून बसले होते. तसेच उमेदवारी दिल्यास त्यांना निवडणुकीत पाडण्याची तयारीही शिवसैनिकांनी केली होती. मात्र आगामी विधान सभा निवडणुकीत बाजी उलटली असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदार सुनील राऊत यांना उमेदवार देऊ नये, त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला असल्याचे सुत्रांकडून समजते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यावेळी हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत होते. त्यावेळी भाजपचे तत्कालिन खासदार किरीट सोमय्या यांनी सेना पक्षनेतृत्त्वावर टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्यावर नाराज होते. त्यातून त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्लाही केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली जाऊ नये म्हणून शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्याचे नेतृत्त्व शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केले होते. सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांना पाडण्याची धमकीही सुनील राऊत यांनी दिली होती. भाजपने अखेर सोमय्या यांना उमेदवारी न देता मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा प्रचार न करता सुनील राऊत यांनी निवडणुकीत स्वत:चाच प्रचार केला होता. त्यामुळे सुनील राऊत यांच्याबद्दल भाजप कार्यकर्ते कमालीचे नाराज होते.

आगामी विधान सभा निवडणुकीत त्याची सव्याज भरपाई करण्याचा निर्धार आता भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. सुनील राऊत यांना उमेदवारी देऊ नये,अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होणार असल्याचे समजते. त्यानंतरही राऊत यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पाडण्याचा निश्चय भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चिघळणार आहे.

First Published on: June 11, 2019 8:18 AM
Exit mobile version