कल्याणच्या पत्रीपुलाने घेतला पहिला बळी

कल्याणच्या पत्रीपुलाने घेतला पहिला बळी

मृत्यू

कल्याण पत्रीपुलावर टेम्पोने रिक्षा आणि मोटारसायकल धडक देऊन झालेल्या अपघात अरुण महाजन यांच्या जागीच मृत्यू झाला असून, विलास रेडकर हे जखमी झाले आहेत. गेल्या आठ महिन्यापासून पत्रीपुलाचे काम धीम्या गतीने सुरु असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिक व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. अखेर पत्रीपुलावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीने पहिला बळी घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कल्याणचे रहिवासी अरुण महाजन आणि विलास रेडकर हे दुचाकीने कल्याणच्या दिशेने जात होते याचवेळी अचानक पत्रीपुलावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने ठाणे रिक्षासह दोन बाईकस्वारांना धडक दिली. त्यात अरुण महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. तर डोंबिवलीचे रहिवासी विलास रेडकर हे जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण पूर्व -पश्चिमेला जोडणारा जुना पत्री पूल धोकादायक ठरल्याने साधारणपणे वर्षभरापूर्वी तो बंद करून ८ महिन्यांपूर्वी पाडण्यातही आला आहे. त्यामुळे सध्या असणाऱ्या पुलावर वाहनांचा ताण येत आहे. गेल्या वर्षभरापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच सध्याच्या पुलावर खड्ड्यांचं अक्षरशः साम्राज्य पसरले आहे. दररोज अनेक छोटे अपघात आणि त्यातून निर्माण होणारे वाद हेदेखील वाहतूक कोंडीप्रमाणे रोजचे झाले आहे. महाजन यांच्या मृत्यूला अपघाताचे निमित्त असले तरी त्यांचा जीव मात्र लोकांशी काही देणेघेणे नसलेल्या मुर्दाड लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि प्रशासनानेच घेतला आहे, अशीच प्रतिक्रिया कल्याणकरांमध्ये उमटली आहे.

First Published on: August 9, 2019 7:34 PM
Exit mobile version