दुकानांना भीषण आग

दुकानांना भीषण आग

दुकान जळल्याचा प्रातिनिधिक फोटो

 

पश्चिमेतील मुरबाड रोडवर असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दोन शोरूम आणि एक गोडाऊन पूर्णपणे भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून, शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुरबाड रोडवरील गोडबोले हॉस्पिटलजवळ एकमेकांना लागून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी दुकाने आहेत. यापैकी एका दुकानातून सकाळी अचानक धूर येऊ लागला. धूर सर्वत्र पसरल्याने दिसेनासे झाल्याने दुकानातील कामगार तातडीने बाहेर पडले. अवघ्या काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या दुकानांमध्येही ती पसरली. काही वेळातच आणखी एक इलेक्ट्रॉनिकचे दुकान आणि गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
या आगीचा धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर काढण्यात आले होते. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तासाभरात ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणालाच दुखापत झाली नाही. मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

First Published on: May 21, 2018 7:43 AM
Exit mobile version