शिवसेनेला भाजपातील बंडखोरांकडून धोका

शिवसेनेला भाजपातील बंडखोरांकडून धोका

Shivsena Bjp

पालघर लोकसभेची जागा युतीने शिवसेनेला सोडली असतानाच या निवडणुकीत कमळचिन्ह नसेल, तर आम्ही अपक्ष लढू असा इशारा आदिवासी आघाडीने दिल्यामुळे शिवसेनेला धोका निर्माण झाला आहे. विद्यमान खासदार आपला असतानाही पालघरची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली. त्यामुळे शिवसेना युती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता होती. मात्र, पालघरमध्ये कमळ चिन्ह नसेल तर आम्ही अपक्ष लढू, असा इशारा भाजपाच्या आदिवासी आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुखाने दिल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना धोका निर्माण झाला आहे. पालघरचे पहिले खासदार बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीतही भाजपाने आपला हा गड राखला होता.

तलासरी येथील भाजपाचे सरपंच आणि आदिवासी आघाडी प्रसिद्धी प्रमुख लुईस काकड यांनी तर उघडपणे बंड केले आहे. जिल्ह्यात भाजपा वाढावी यासाठी आम्ही जीवाचे रान केले. तत्कालीन परिस्थितीत आम्हाला भयंकर असा संघर्ष करावा लागला. माझा संसार उघड्यावर आला. अशावेळी जर लोकसभेला कमळ नसेल तर आम्ही अपक्ष लढू, असा इशाराही त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिला आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे नवीन अडचण निर्माण झाली आहे. पालघर लोकसभेसाठी युतीचे समन्वयक म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. ते भाजपातील बंडखोरीचा हा प्रश्न कसा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्यात भाजपला 2 लाख 72 हजार 780 तर शिवसेनेला 2 लाख 43 हजार 206 मते मिळाली होती. त्यांचा प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीला 2 लाख 22 हजार 837 मते पडली होती. या निवडणुकीत युती झाल्यामुळे शिवसेना -भाजपाच्या मतांची बेरीज 5 लाखांहून अधिक होत असल्याने शिवसेनेचा विजय होण्याचे गणित मांडण्यात येत होते. मात्र, भाजपातील बंडखोरीमुळे शिवसेनेला धोका निर्माण झाला आहे.

First Published on: March 18, 2019 4:33 AM
Exit mobile version