खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूटमार सुरूच

खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूटमार सुरूच

खासगी बस

परिवहन विभागाच्या शासननिर्णयाला केराच्या टोपलीत टाकून खासगी बस वाहतूकदार सध्या कोकणात जाणार्‍या प्रवाशांची मनमानीपणे लूट करत आहेत. सध्या कोकणात शिमग्याला जाणार्‍यांची गर्दी आहे. त्यानंतर उन्हाळ्याची सुटी सुरू होईल. याचाच गैरफायदा घेत खासगी वाहतूकदारांनी चाकरमान्यांकडून दामदुप्पट भाडे आकारणे सुरू केले आहे. यासंबंधी परिवह विभागात अनेक तक्रारी दाखल झाल्या तरी खासगी बस वाहतूकदार याकडे कानाडोळा करत आहेत.

सुट्टयांच्या हंगामात खासगी कंत्राटी बस वाहतूकदार मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करून प्रवाशांंची आर्थिक पिळवणूक होत होती. या संबंधित अनेक तक्रारी परिवहन विभागाला आल्या होत्या. तेव्हा शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी निर्णय घेतला आणि खासगी ट्रॅव्हल्स बसगाड्यांचे किमान भाडे निश्चित करण्यात आले. तरीसुद्धा सध्या खासगी बस वाहतूकदारांकडून गर्दीचा गैरफायदा घेत मुंबई – कोकण मार्गावर दुप्पट भाडे आकारले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देवगड तिकीट भाडे ४०० ते ५०० रुपये असताना हे दर ८०० ते ९०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत आहे. दुप्पट भाडे आकारणार्‍या खासगी बस चालकांवर निर्बंध घालून त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जाणता राजा प्रतिष्ठाण आणि कामगार आघाडी अध्यक्ष आनंद केशव यांनी केली आहे.

मुंबईहून कोकणात जाणारी खासगी बसचे नियमित भाडे रू. ४५० ते ५५० रुपये इतके असतात. याच खासगी बसगाडीचे मालक उन्हाळाच्या सुट्यात, गणेशोत्सव, होळी, दीपावली आदी सणासुदीच्या वेळी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांकडून तब्बल ९०० ते १२०० प्रवास भाडे वसूल करतात हे अन्यायकारक आहे. पण यामध्ये कोकणात जाणार्‍या प्रवाशांचा काय दोष आहे? कोकणात जाणारे महामार्ग, रस्ता तोच असतो, डिझेल इंजिन खर्च तेवढाच होतो पण कोकणात सणासुदीच्या सुट्टीच्या काळात जाणार्‍या चाकरमान्यांची होणारी लूट थांबविणे गरजेचे आहे. परिवहन खात्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाडीचे भाडेदर निश्चित करून दिले आहे. तरीही आज सर्रासपणे शासनाच्या आदेशाचे पालन होत नाही. यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही अशा बसमालकांवर परिवहन विभागाकडून कारवाई होत नाही.

सुट्टीच्या हंगामात मुंबईतून कोकणात जाणार्‍यांची संख्या अधिक असते. या गर्दीच्या फायदा घेत आज खासगी बस मालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. यासंबंधी आम्ही अनेकदा परिवहन विभागाला तक्ररी केल्या आहेत. तरीही अशा खासगी बसमालकांवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. परिवहन विभागाने दुप्पट भाडे आकारणार्‍या खासगी बसमालकांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करणे अपेक्षित आहे.
– आनंद केशव सरमळकर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार संघटना

First Published on: April 2, 2019 4:26 AM
Exit mobile version