मेट्रो-४च्या कामामुळे ठाणेकरांचे होणार हाल!

मेट्रो-४च्या कामामुळे ठाणेकरांचे होणार हाल!

‘मेट्रो ४’ प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रोच्या मार्गासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली आहे. घोडबंदर मार्गावरील ब्रह्मांड नाका, डोंगरीपाडा अशा ठिकठिकाणी कामाला सुरूवात झाली आहे. मात्र यामुळे घोडबंदर रोडवर पुढील चार वर्षे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मेट्रोसाठी पुढील चार वर्षे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

१ ऑक्टोंबरनंतर वाहतूक विभाग परवानगी देणार

सध्या सुरू असलेला पावसाळा आणि ठाण्यात नव्याने सुरू झालेले मेट्रोचे काम यांचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाकडून १ ऑक्टोबरपर्यंत रिलायन्स एजन्सीला फक्त माती परीक्षणासाठी रस्त्यामध्ये बॅरिकेटस् बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे. एम.एम.आर.डी.ए.च्या परवानगीनुसार वाहतूक विभाग १ ऑक्टोबरनंतर परवानगी देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वडाळा ते कासारवडवली मेट्रोमार्गाला सुरुवात

कापूरबावडी रेल्वे स्टेशन उभारण्यास सुरुवात

२४ डिसेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे भूमीपूजन केले होते. ४ जानेवारी २०१७ ला संबंधित कामाच्या निविदा निघाल्या होत्या. हे काम पाच टप्प्यांत विभागून देण्यात आले होते. वडाळा ते अमर मंडळ जंक्शन, गरोडियानगर ते सूर्यानगर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडवली या दरम्यान १० निविदाकारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी आयटीडी सीमेंटेशन या कंपनीला कापूरबावडी ते कासारवडवली दरम्यानचे काम मिळाले आहे. त्यांनी या कामाची सुरुवात केली असून मेट्रोचे कापूरबावडी रेल्वे स्टेशन उभारण्यासही सुरुवात झाली आहे. वडाळा ते कासारवडवली दरम्यानचा ३२.३२ किमी लांबीचा मार्ग असून त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कुठल्या मार्गांवर मेट्रो स्थानके उभारणार?

कासारवडवली, विजय गार्डन, रेल्वे स्थानक, डोंगरीपाडा, टिकुजीनीवाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी (महापालिका जंक्शन), आरटीओ, तीन हात नाका, मुलुंड चेकनाका, मुलुंड अग्निशमन, सोनापूर, शनर्गिला, भांडूप मेट्रो, नेव्हल हाऊसिंग, गांधीनगर, सूर्यानगर, विक्रोळी मेट्रो, गोदरेज कंपनी, श्रेयस सिनेमा, लक्ष्मीनगर, पंतनगर, गारोडियानगर, अमर महल, सिद्धार्थ कॉलनी, सुमननगर, अनिलनगर, वडाळा टीटी आणि भक्तीपार्क ही मेट्रो स्थानके या मार्गावर उभारली जाणार आहेत.

First Published on: August 5, 2018 6:43 PM
Exit mobile version