दहावी, बारावीच्या परीक्षांना महापालिकेची परवानगी

दहावी, बारावीच्या परीक्षांना महापालिकेची परवानगी

BMC

मुंबईतील शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने दहावी व बारावीच्या परीक्षा कशा होणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांने नुकसान होऊ नये यासाठी सर्व बोर्डांना दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. राज्य मंडळ, आंतरराष्ट्रीय आणि केंद्रीय बोर्डाच्या ९ वी ते १२ वीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यात असे प्रशासनाने म्हटले असून, या परीक्षा २३ जानेवारीनंतर कधीही घेता येणार आहेत.

राज्यभरामध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अद्याप मुंबईमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यातच सध्या सर्व शैक्षणिक मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षाचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. एकीकडे शाळा सुरू झाल्या नसताना परीक्षा कशा होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमोर पडला आहे. शिक्षक संघटनांनीही दहावी व बारावीच्या परीक्षासंदर्भात सरकारने धोरण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता याव्यात यासाठी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि आयजीसीएसई या मंडळांनी परीक्षा घेण्यासंदर्भात महापालिकेकडे परवानगी मागितली होती. केंब्रिज बोर्डाच्या ९ वी ते १२ वीच्या परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रकाचे नियोजन झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व मंडळांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास मुंबई महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भातील एक परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी मंगळवारी रात्री उशिराने जारी केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मास्क, सानिटाईजर, आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असल्याचे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

राज्य मंडळ, आंतरराष्ट्रीय आणि केंद्रीय बोर्डाला आता त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. मेंबर्स ऑफ इंटरनॅशनल स्कूल्स असोसिएशन (केंब्रिज बोर्ड) यांच्या इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.
– महेश पालकर, शिक्षण अधिकारी, मुंबई महानगरपालिका
First Published on: January 13, 2021 8:56 PM
Exit mobile version