फ्लॅट विक्रीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणुक; आरोपीला अटक

फ्लॅट विक्रीच्या आमिषाने ५० लाखांची फसवणुक; आरोपीला अटक

फसवणूक

फ्लॅट विक्रीच्या आमिषाने एका व्यक्तीची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. मुंबईतल्या गिरगावमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी फ्लॅटमालक आरोपी अमुल्ला इक्बाल पोथीयावाला याला अटक केली आहे. आरोपीला कोर्टामध्ये हजर केले असता त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फ्लॅट विक्रीच्या नावे फसवणुक

गिरगावमध्ये राहणारे रमेशकुमार परोहित यांची आरोपी पोथीयावाला याने फसवणुक केली आहे. रमेशकुमार यांचा कम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय आहे. जून महिन्यांत त्यांचा परिचित एजंट संजय जैन यांनी अमुल्ला पोथीयावाला यांच्याशी ओळख करुन दिली होती. या ओळखीत पोथीयावालाने त्याचा कांदिवली येथे प्लॅट असल्याचे सांगितले. हा फ्लॅट विकायचा असल्याचे त्याने रमेशकुमार यांना सांगितले. हा फ्लॅट १ कोटी ४० लाखांमध्ये देऊ असे पोथीयावाला यांने सांगितले होते. हा फ्लॅट विकत घेण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले. यावेळी पोथीयावालाने संबंधित फ्लॅटवर ५० लाखांचे कर्ज असल्याचे रमेशकुमार यांना सांगितले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने ५० लाख रुपये द्यावे अशी मागणी रमेशकुमार यांना केली.

अखेर आरोपीला अटक

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जून ते ऑक्टोबर महिन्यांत रमेशकुमार यांनी आरटीजीएसद्वारे पोथीयावालाला पाच वेळा प्रत्येकी १० लाख रुपये असे ५० लाख रुपये दिले हेाते. मात्र ही रक्कम दिल्यानंतर पोथीयावालाने फ्लॅट विक्रीस नकार देत रमेशकुमार यांना त्यांचे पैसे देण्यासही नकार दिला. पोथीयावालाकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच रमेशकुमार यांनी डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमुल्ला पोथीयावाला याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली. आज कोर्टात त्याला हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – 

फ्लॅटच्या नावाने पंधरा लाख रुपयांची फसवणुक

गोरेगावमध्ये घर घेताय? मग फसवणुकीपासून सावधान!

First Published on: November 23, 2018 7:45 PM
Exit mobile version