घरमुंबईगोरेगावमध्ये घर घेताय? मग फसवणुकीपासून सावधान!

गोरेगावमध्ये घर घेताय? मग फसवणुकीपासून सावधान!

Subscribe

फ्लॅट बुक करूनही ताबा न मिळाल्याने गोरेगावमध्ये बिल्डरविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव म्हणजे मुंबईतला महत्त्वाचा भाग. या ठिकाणी घरांच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये इथे कोट्यवधींची उलाढाल होते. अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. असाच एक प्रकार गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये घडला असून एका बिल्डरने दोन जणांना तब्बल ४३ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पैसे देऊनही फ्लॅट नावावर नाही!

सिद्घार्थ नगरमधल्या धनलक्ष्मी विद्या निकेतन मार्गावर एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. याच ठिकाणी आरोपी बिल्डरचं एक ऑफिस देखील आहे. या ऑफिसामधून बिल्डिंगमधल्या फ्लॅटची खरेदी-विक्री होत असे. बिल्डिंगचं काम बऱ्याच दिवसांपासून व्यवस्थित सुरू असल्याचं पाहून तक्रारदार ओमप्रकाश सिताराम सराफ (वय ७० वर्षे) या वयोवृद्ध व्यक्तीने आणि त्यांच्या मित्राने या इमारतीमध्ये प्रत्येकी एक फ्लॅट बुक केला. यासाठी फ्लॅटच्या किंमतीच्या २० टक्के रक्कम म्हणजेच ४३ लाख २४ हजार ५०० रुपयांची रक्कमही त्यांनी आरोपी बिल्डरला दिली. विशेष म्हणजे, यानंतर बिल्डरने त्यांना फ्लॅट अलॉटमेंट लेटरही दिले. पण, ठरलेल्या तारखेला बिल्डरने फ्लॅटचा ताबाच दिला नाही. वारंवार विचारणा करूनही बिल्डर आणि त्याचे साथीदार सराफ आणि त्यांच्या मित्राला टोलवाटोलवीची उत्तरं देत होते. याशिवाय, २० टक्के रक्कम भरून देखील फ्लॅटची नोंदणी त्यांच्या नावावर करण्यात आली नव्हती.

- Advertisement -

हेही वाचा – गुंतवणुकीचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक


चौघांविरोधात गुन्हा दाखल

या चौघांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओमप्रकाश सराफ आणि त्यांच्या मित्रांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर रविवारी संबंधित बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरुद्ध पोलिसांनी कट रचून फसवणूक करण्यासंदर्भात गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असून लवकरच चारही आरोपींची पोलिसांकडून जबानी नोंदविली जाणार आहे. या जबानीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -