नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ; दोघा भामट्यांना अटक!

नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ; दोघा भामट्यांना अटक!

दुधात भेसळ (प्रातिनिधिक फोटो)

तुमच्या घरी अमूल, गोकुळ, महानंदा किंवा गोविंद या कंपन्यांचं दूध जर येत असेल, तर तुम्ही भेसळयुक्त दूध पित असल्याची दाट शक्यता आहे. कारण या कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करणाऱ्या २ भामट्यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने घाटकोपरमधून अटक केली आहे. सत्त्या सितारामलू पित्ताला आणि इन्कान्ना जानहे अली अशी या दोघा भामट्यांची नावं आहेत. या दोघांनाही पुढील कारवाईसाठी पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

त्यांच्याकडे सापडल्या बोगस पिशव्या आणि दूध!

घाटकोपर परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील मनीष श्रीधनकर, सुनयना सोनावणे आणि इतर सहकाऱ्यांनी घाटकोपरच्या पंतनगर, गुरुनानक नगरातील एका रूममध्ये छापा टाकला. यावेळी तिथे सत्त्या पित्ताला आणि इन्कान्ना अली हे दोघेही दुधात भेसळ करताना दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी गोकूळ, अमूल मदर डेअरी, महानंदा आणि गोविंद कंपन्यांचे २३७ लिटर दूध, ७५ बोगस पिशव्या आणि दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले.


हेही वाचा – मुंबईकर पितात भेसळयुक्त दूध

पोलीस कोठडीत रवानगी

या दोघांविरुद्ध भादंविसह अन्न सुरक्षा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

First Published on: July 18, 2019 8:28 PM
Exit mobile version