पार्टी थांबवायला गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की

पार्टी थांबवायला गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की

प्रातिनिधीक छायाचित्र

मिरा रोडवरच्या पुनम गार्डनजवळ असणाऱ्या समृद्धी अपार्टमेंटमध्ये मोठ्या आवाजात होत असलेली पार्टी थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच तरुणांनी धक्काबुक्की करुन डांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समृद्धी अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री काही तरुण वाढदिवसाची पार्टी साजरी करत होते. मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्याने शेजाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता, त्यामूळे शेजाऱ्यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. त्यानंतर ही पार्टी थांबवण्यासाठी मिरा रोड पोलीस ठाण्यातून कॉंन्स्टेबल हरीषचंद्र झांजे आणि प्रदिप गोरे हे समृद्धी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. गेटवर असणाऱ्या वॉचमनने त्यांना तरुणांच्या खोलीजवळ नेऊन सोडल्यांनतर पोलिसांनी दरवाजा ठोठावला पण आतल्या तरुणांनी दरवाजा उघडून पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

दरम्यान, हे सगळे तरुण दारुच्या नशेत होते. या पार्टीला एकूण १४ तरुण उपस्थित होते यामध्ये दोन तरुणींचाही समावेश होता. ३१ वर्षीय चिराग त्रिवेदी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सगळे या अपार्टमेंटमध्ये जमले होते. पण दारुच्या नशेत असल्यामुळे मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यामूळे त्याचा त्रास शेजाऱ्यांना झाला आणि त्यांनी तक्रार केली. याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली असून कॉंन्सेबल हरीषचंद्र झांजे, प्रदिप गोरे जास्त जखमी झाले नसल्याची माहिती मिरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत लाबडे यांनी दिली आहे. या सगळ्या तरुणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून ते पुर्णपणे नशेत असल्याचे समजले. पार्टीच्या ठिकाणी दारुच्या बाटल्या, हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत.

First Published on: July 18, 2018 12:42 PM
Exit mobile version