ईडी कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

ईडी कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले

आनंद परांजपे (छाया-अमित मार्कंडे)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर इन्फोसमेंट डायरेक्टर (ईडी) कार्यालयाने नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे शुक्रवारी स्वतः ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सुमारे ४ हजार कार्यकर्त्यांना शहराच्या विविध ठिकाणी पोलिसांनी अडवले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच, ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे मुख्यालयातून ईडी कार्यालयात मोर्चाने निघालेल्या कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेरच ताब्यात घेण्यात आले.

इन्फोसमेंट डायरेक्टर (ईडी) कार्यालयाने राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याचा आरोप ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामुळे देशभर खळबळ उडाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेकांनी ईडीच्या शरद पवार यांच्यावरील या कारवाईचा निषेध केला. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड संताप निर्माण झाला. याप्रकरणी ईडी ने आपली चौकशी करावी यासाठी शरद पवार हे स्वतः शुक्रवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. यामुळे शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारो कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यभर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. ठाणे शहराच्या विविध भागातून सुमारे ४० बसगाड्या आणि अन्य वाहनांमधून सुमारे ४ हजार कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, गुरुवारी रात्रीपासूनच या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, या ४० बसगाड्या रोखून धरल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहरअध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखालीठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो युवक, पुरुष व महिला कार्यकर्ते ईडी कार्यालयाकडे मोर्च्याने जाण्यासाठी निघाले. ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है, नरेंद्र मोदी हाय हाय, फसवणीस सरकार चोर है, अमीत शहा चोर है, पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’, आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यालयाबाहेरच अडवून पोलीस व्हॅनमध्ये कोंबून अटक केली. अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर जमावबंदीचा गुन्हा नोंदवून सर्वांना नौपाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. सायंकाळी सर्वांची सुटका करण्यात आली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी, “शरद पवार यांचा शिखर बँकेच्या तथाकथीत घोटाळ्याशी कोणत्याही प्रकारचा सबंध नसतानाही त्यांच्यावर राजकीय हेतूने गुन्हा नोंदवण्यात आला. पण, नोटाबंदीच्या काळात अमित शहा ज्या जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत, त्या बँकेत ५ दिवसांत १४ हजार ३०० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्या प्रकरणात त्यांच्यावर ईडीची नोटीस का बजावण्यात आली नाही. आज या सरकारने पोलीस बळाचा वापर करुन आम्हाला रोखले असले तरी सामान्य जनतेच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनातील उद्रेकाला हे सरकार कसे काय रोखणार? येत्या २१ ऑक्टोबरला हा उद्रेक इव्हीएमच्या माध्यमातून दिसून येईल”, असे सांगितले.

यावेळी महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, नगरसेवक मुकुंद केणी, नगरसेविका प्रमिला केणी, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, शहर कार्यकरिणी सदस्य प्रभाकर सावंत, अजित सांवत, शिवा कालुसिंह, विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, निलेश कदम, कौस्तुभ धुमाळ, प्रदिप झाला, वार्ड अध्यक्ष पप्पू अस्थाना, फिरोज पठान, सुमित गुप्ता, प्रदेश सचिव शशिकला पुजारी, प्रदेश सचिव ज्योती निंबरंगी, फुलबानो पटेल, कांता गजमल, अनिता मोटे, माधुरी सोनार, वंदना लांडगे, पूनम वालीया, स्मिता पारकर, शुंभागी कोळपकर, खिलारे सुवर्णा, विजयलक्ष्मी दामले, भानुमती पाटील, लता सुर्यवंशी, राजभर ताई, सुरेखा जाधव, रुचिता मोरे, सुनिता जुवले, निलोफर भाभी, सुरैय्या भाभी, युवक विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, सुधीर शिरसाठ, उपाध्यक्ष संकेत नारणे, जावेद शेख, संदिप वेताळ, विशांत गायकवाड तसेच मोठ्या संख्येने वार्ड अध्यक्ष, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: September 27, 2019 4:01 PM
Exit mobile version