येत्या डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरणार; बांधकाम विभागचे सचिव सदाशिव साळुंखेंची माहिती

येत्या डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरणार; बांधकाम विभागचे सचिव सदाशिव साळुंखेंची माहिती

मुंबई : राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून बुजवायला सुरुवात केली जाईल. डिसेंबर अखेरपर्यंत राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्डे पूर्णपणे भरण्यात येऊन रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांनी शुक्रवारी दिली. (Potholes on roads will be filled by next November information of Satish Salunkhe)

राज्यात झालेल्या पावसामुळे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. यावर्षी केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अभियंता दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राजावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपली चूक होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत, अशा शब्दांत चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभगातील अभियंत्यांचे कान उपटले होते.

या पार्श्वभूमीवर सदाशिव साळुंखे यांनी विभागाच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निधीतून खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यात महामार्ग आणि जिल्हा महामार्ग मिळून जवळपास ९८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर सध्या ३५ ते ४० टक्के खड्डे पडले आहेत. पावसाळा संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात राज्य महामार्ग तर डिसेंबर महिन्यात जिल्हा मार्गावरील खड्डे भरले जातील. खड्डे भरण्यावर जवळपास ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांसाठी नाबार्डचा ७५० कोटीचा निधी

राज्यात नव्या रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी नाबार्डकडून सन २०२२ -२३ या वर्षासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून नव्या रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याची माहिती सतीश साळुंखे यांनी दिली.


हेही वाचा – हृदय बंद पडलेल्या व्यक्तीला वाचविणे शक्य; पालिका देणार प्राथमिक उपचाराचे धडे

First Published on: September 23, 2022 7:57 PM
Exit mobile version