मुंबईतील खड्डे अभियंत्यांच्या देखरेखीखालीच बुजवा

मुंबईतील खड्डे अभियंत्यांच्या देखरेखीखालीच बुजवा

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स तंत्राचा वापर केला जात असला तरी हे खड्डे बुजवण्याचे ज्ञान कामगारांना नाही. अभियंत्यांच्या निरिक्षणाखाली खड्डे बुजवले जात नसल्याने ही संकल्पना अयशस्वी ठरली असल्याचे सांगत या तंत्राद्वारे खड्डे बुजवण्यासाठी कामगारांसह अभियंत्यांनाही प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव महापालिका सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची सूचना

मुंबई महापालिकेचा सन २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समिती सुधारीत शिफारशींसह मंजूर करण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहात मांडण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सोमवारी महापालिका सभागृहात अर्थसंकल्प मांडताना रस्त्यांवरील खड्डयांबाबत सूचना केली. माहुल येथील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत रासायनिक कंपन्यांतून निर्माण होणार्‍या वायुंमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे हवेत दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे केवळ नागरी सुविधा पुरवण्यास प्राधान्य न देता तेथील नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही अशाप्रकारे कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा शक्य झाल्यास या प्रकल्पबाधित कुटुंबियांना जागेच्या उपलब्धतेनुसार अन्यत्र स्थलांतरीत करावे अशी सूचना करण्यात आली आहे.

या आहेत समस्या

पाण्याची वितरण व्यवस्था सदोष असल्याबाबत मागील कित्येक वर्षांपासून सर्व नगरसेवकांची तक्रार आहे. जलाशयांमधील अपुरी पाण्याची पातळी, पाण्याचा अपुरा दाब, दुषित पाणी, अवेळी होणारा पाणीपुरवठा, अपुरे अभियांत्रिकी कर्मचारी, कामगार, साधने आणि वाहने इत्यादी समस्या सोडवणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची मागणी करत त्यांनी प्रत्येक विभागवार एक कक्षाची स्थापना करावी, असे म्हटले आहे.

मुंबईतील दवाखाने रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेचे दवाखानेही अष्टोप्रहर सुरु ठेवावेत. यासाठीची कार्यवाही त्वरीत करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. महापालिका शाळांमधील शिक्षकांना अनेकदा अन्य शाळांमध्ये काही कामांसाठी जावे लागते किंबहुना महापालिका तसेच शासनाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास जावे लागते. त्यामुळे दोन्ही वेळची उपस्थिती नोंदवण्यासाठी त्यांना पुन्हा शाळेत जावे लागत असल्यामुळे मध्यममार्ग काढला जावा अशीही सूचना त्यांनी केली आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिका पुन्हा मांडणार फुगीर अर्थसंकल्प

हेही वाचा – मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!

हेही वाचा – मुंबईतील खड्ड्यांना पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांची नावं!


 

First Published on: March 1, 2019 10:27 PM
Exit mobile version