महापालिका शाळांच्या मुख्यध्यापकांना लवकरच मिळणार नेतृत्त्वविकासाचे धडे

महापालिका शाळांच्या मुख्यध्यापकांना लवकरच मिळणार नेतृत्त्वविकासाचे धडे

संग्रहित छायाचित्र

मुख्याध्यापक हा शाळा आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. ‘जसा मुख्याध्यापक, तशी शाळा’ हे वास्तव असते. त्यामुळे मुंबई महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, त्यांनी एकप्रकारे शाळांचा मुख्याधिकारी म्हणूनच सर्वतोपरी भूमिका बजावावी, यासाठी नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे उद्गार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी काढले आहेत. (Principals of municipal schools will soon get leadership development lessons)

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांना ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्’ यांच्याद्वारे नेतृत्व विकासासाठी लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी भिडे या बोलत होत्या.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी याआधीच हे दौरे केले असते तर.., गुलाबराव पाटलांचा शिवसंवाद यात्रेवरून टोला

भायखळा येथील राणी बागेतील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन देखील श्रीमती भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालिकेच्या वतीने सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्च्या वतीने संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा.कविता लघाटे, राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि महापालिकेच्या शाळांचे सुमारे १२० मुख्याध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी, नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याने मुख्याध्यापकांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् सारख्या नामांकित संस्थांद्वारा मुख्याध्यापकांना असे प्रशिक्षण देणारी मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असल्याचे सांगितले. तर, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ.आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी, महापालिकेसोबत मिळून असा उपयुक्त उपक्रम राबवित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

हेही वाचा – गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

मुख्याध्यापक नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण

पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांसाठीचे नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण ३ महिन्यात ४० सत्रे व ६० तासांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामध्ये, व्यवस्थापन कौशल्ये, आर्थिक बाबी हाताळणे, विद्यार्थी, पालक, समाज, लोकप्रतिनिधी यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन करणे, संघभावनेतून कामकाज करण्याचे कौशल्य विकसित करणे, स्व-विकास करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, शालेय विकासाचा दूरगामी आराखडा तयार करणे, निर्णयक्षमता वाढवणे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अशा शालेय विकासासाठी आवश्यक विविध बाबींचा समावेश असणार आहे.

First Published on: July 22, 2022 7:09 PM
Exit mobile version